Ahmednagar News : मुळा धरणात ‘एवढं’च पाणी राहिलंय, दशकाच्या इतिहासातील सर्वात कमी पाणीसाठा, संकट गंभीर

Ahmednagarlive24 office
Updated:
mula dam

 

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात उत्तरेसाठी व दक्षिणेतील अनेक गावांसाठी मुळा धरण वरदान ठरले आहे. शेतीसाठी व पिण्यासाठी हे धरण वरदान ठरत आहे.

परंतु यंदा पाऊस कमी झाला तसेच जायकवाडीला देखील पाणी सोडल्याने मुळा धरणामध्ये पाणी कमी राहिले आहे. काल शनिवारी अवघा २,००३ दशलक्ष घनफूट उपयुक्त साठा शिल्लक होता. मागील वर्षी मे महिन्यात २५ तारखेला ८, १०४ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता.

म्हणजेच एकंदरीतच मागील वर्षीच्या तुलनेत उपयुक्त साठा चारपट कमी झालेला दिसतो. त्यामुळे जलसंकट हे गंभीर स्वरूप धारण करेल असे दिसते. मुळा धरणात १९७२ साली पाणी साठविण्यास सुरुवात झाली.

धरण प्रकल्पात राहुरी, नेवासे, पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील ८५ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले. धरणाच्या पाण्यावर लाखो शेतकऱ्यांचे प्रपंच फुलले. पिण्याच्या पाणी योजना व औद्योगिक क्षेत्राला पाणी मिळाल्याने मुळा धरण दक्षिण नगर जिल्ह्याची जीवनदायिनी ठरले आहे. त्यामुळे ‘मुळा’च्या पाण्याकडे सर्वांचे लक्ष वेधलेले असते.

सन २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३ वर्षात धरण पूर्ण क्षमतेने २६ हजार दशलक्ष घनफूट भरले होते. सलग चार वर्षे सुरुवातीपासून पाऊस चांगला झाल्याने खरीप हंगामात सिंचनाचे आवर्तन सोडण्याची गरज भासली नव्हती. परंतु मागील २०२३-२४ हंगामात निसर्गाने कूस बदलली

. धरण २३,७५२ दशलक्ष घनफूट (९१.३५ टक्के) भरले. २,२४८ दशलक्ष घनफूट पाणी कमी जमा झाले. मागील वर्षी धरणाच्या पाणलोट लाभक्षेत्रात पावसाळ्याच्या व सुरुवातीला जून, जुलै २०२३ मध्ये अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे खरीप हंगामात सिंचनासाठी आवर्तन सोडावे लागले.

त्यात ३५०० दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाला. २६ नोव्हेंबर २०२३ रोजी जायकवाडीला १९६० दशलक्ष घनफूट पाणी सोडले. दुष्काळात तेरावा महिना आला. त्यामुळे धरणात ७,७०८ दशलक्ष घनफूट पाणी घटले. यंदा उपयुक्त साठा अवघा २००० दशलक्ष घनफूट शिल्लक राहिला. पाऊस कधी होणार याची सर्वांना प्रतीक्षा लागली आहे.

 कमी पाण्यामुळे शेतीला बसतोय फटका
मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरले तरी सिंचनाची साधारण तीन आवर्तने होत असतात. २०१९-२० ते २०२२-२३ दरम्यान खरीप हंगामात आवर्तनाची गरज भासली नव्हती. रब्बी हंगामात एक व उन्हाळी हंगामात दोन आवर्तन मिळाली. परंतु यंदा २०२३-२४ वर्षात खरिपाचे आवर्तन सोडावे लागले. रब्बीचे एक आवर्तन झाले. त्यामुळे उन्हाळ्यात एकच आवर्तन मिळाल्याने शेतीला फटका बसताना दिसतोय.