Ahmednagar News : जलजीवनला अद्याप पाणीच नाही, मग सरकारचा पैसा कोणाच्या खिशात? खासदार वाकचौरे यांचा गंभीर आरोप

Pragati
Published:

Ahmednagar News : प्रत्येकाला नळाच्या पाण्याचे कनेक्शन देण्याच्या उद्दिष्टाने पंतप्रधान मोदींनी जल जीवन मिशन सुरू केले होते. त्याअनुषंगाने आज प्रत्येक गावात जलजीवन योजनेची कामे सुरू आहेत. परंतु अजूनही लोकांना पाणी मिळालेले नाही. सरकारचा हा पैसा कोणाच्या खिशात जात आहे, याची चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी नवनिर्वाचित खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केली.

येथील यशोधन संपर्क कार्यालयात महाविकास आघाडीच्यावतीने आयोजित सत्कार समारंभप्रसंगी खा. वाकचौरे बोलत होते. ते म्हणाले की, तालुक्यातील जनतेने पूर्वीप्रमाणेच यावेळीही माझ्यावर विश्वास दाखवून निवडून दिले. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. तालुक्यातील शेती, वीज, पाणी, उद्योग यासह इतर प्रश्न सोडविण्यास आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

श्रीरामपूर तालुक्यातील विविध प्रश्नांची मला जाण आहे. अनेकांनी आपल्या भाषणातून शेती, वीज, पाणी, उद्योग, शहरातील रेल्वे, बस स्थानक या प्रश्नांची उकल केली. केंद्र सरकारच्या माध्यमातून हे प्रश्न सोडविण्याचा आपला प्रयत्न राहील. तालुक्यात तीर्थक्षेत्र पर्यटन विकासाला वाव असून त्यासाठी प्रयत्न करू, शेतकऱ्यांना विजेच्या बाबतीत मुक्त करावयाचे असेल तर सोलर वीज पंप मोफत देण्याची प्रथम मागणी आपण करणार आहोत, त्यामुळे शेतकऱ्यांना २४ तास वीज मिळेल.

प्रत्येक गावात जलजीवन योजनेची कामे सुरू आहेत. परंतु अजूनही लोकांना पाणी मिळालेले नाही. सरकारचा हा पैसा कोणाच्या खिशात जात आहे, याची चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी आमदार लहू कानडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

यावेळी संजय छल्लारे, तालुकाध्यक्ष लखन भगत, राधाकिसन बोरकर, अशोक थोरे, सचिन बडदे, रमेश घुले, रोहित वाकचौरे, उद्योजक अंकुश कानडे, लाल पटेल, माजी जि. प. अध्यक्ष मिस्टर शेलार, माजी नगरसेवक अशोक कानडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

तर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण नाईक, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, महिला प्रदेश सरचिटणीस डॉ. वंदना मुरकुटे, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) समन्वयकप्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण नाईक यांनी प्रास्ताविक करून निवडणूकीतील विविध घटकांचा आढावा घेतला. तसेच उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे स्वागत केले. या कार्यक्रमासाठी श्रीरामपूर तालुक्यासह राहुरी तालुक्यातील ३२ गावातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, गाव प्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्यने हजर होते.
यावेळी विविध पक्ष संघटना व पदाधिकाऱ्यांनी खा. वाकचौरे यांचा सत्कार केला. सचिन जगताप यांनी मांडलेल्या अध्यक्षीय सूचनेस सतीश बोर्डे यांनी अनुमोदन दिले. सचिन जगताप यांनी सूत्रसंचालन केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe