अहमदनगर बातम्या

अहमदनगर मधील ‘हा’ कारखाना वापरणार ए.आय. तंत्रज्ञान, ठरणार देशातील पहिला कारखाना

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : बदलत्या मुक्त अर्थव्यवस्थेत साखर कारखानदारीत अमुलाग्र बदल होत आहे. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी कोल्हे सहकारी साखर कारखाना हे बदल आत्मसात करत स्पर्धेला सामोरे जात आहे.

महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीशी करार करून उपग्रह आणि कृत्रिम बुद्धीमत्तेचा (ए.आय) प्रभावी वापर करणारा कोल्हे कारखाना देशातील पहिला साखर कारखाना ठरल्याची माहिती अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी दिली आहे. याबाबत कोल्हे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी देश-विदेशातील साखर कारखान्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रगत तंत्रज्ञानाचा अभ्यास करत भारत देशातील साखर उद्योगास सातत्याने मार्गदर्शन केले.

या कारखान्यात प्रचलित पद्धतीनुसार साखर उतारा तपासून त्यानंतरच ऊस तोडणीचा कार्यक्रम राबविण्यासाठी बराच वेळ जात असे, तसेच गाळप हंगाम सुरू करताना अपरिपक्व ऊस मध्येच गाळपाला आला तर साखर उताऱ्यावर परिणाम होत होता. त्यासाठी कारखान्याने महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीशी करार करून उपग्रहाद्वारे ऊस प्लॉटचे मापन, मल्टीस्पेक्ट्रम कॅमेऱ्याच्या सहाय्याने

ऊस पिकातील हरितद्रव्य पृथक्करण करून शेतात उभ्या असलेल्या ऊसाची साखर उतारा तपासणी केली जाते. त्यासोबत हवामान घटकांचादेखील उपग्रहाच्या सहाय्याने अभ्यास केला जातो. या सर्व माहितीचे कृत्रिम बुद्धीमत्तेचे मॉडेल वापरून पृथक्करण केले जाते व प्रत्येक आठवड्याला त्यात आलेले निष्कर्ष कारखान्याच्या प्रयोगशाळेतही त्याची फेर पडताळणी केली असता, ते ९५ टक्क्यांपेक्षा अचुक आढळून आल्याने कारखान्याने

त्यावर आधारीत ऊस तोडणी कार्यक्रम राबवून खर्चात बचत करत ०.२ टक्के अधिक साखर उतारा मिळाला आहे. कारखान्यांने प्रायोगिक तत्वावर ५०० शेतकऱ्यांच्या ऊस प्लॉटचे उपग्रहाद्वारे आलेल्या जैविक व अजैविक ताणाचेदेखील निरीक्षण केले. त्यातही समाधानकारक निष्कर्ष मिळाले.

या सर्व माहितीचा उपयोग करून शेतावर आलेल्या कीड रोगांची माहिती तसेच पाण्याच्या ताणाचेही उपग्रहाच्या सहाय्याने पृथक्करण करून त्याचा सभासद शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे,

केन मॅनेजर जी. बी. शिंदे, ऊस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर, महिंद्रा कंपनीचे करमयोग सिंग, मंदार गडगे, सुमित दरफले, किरण किर्दक यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी प्राधान्यांने अंमलबजावणी करत आहेत.

पूर्णपणे कागदविरहित काम
ए.आय. तंत्रज्ञानात वेळोवेळी सुधारणा करून महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीचे मार्गदर्शकांच्या मदतीने टप्प्याटप्प्याने वाढ करत मागील वर्षापेक्षा साखर उताऱ्यात ०.२ टक्क्यांची समाधानकारक वाढ मिळवली आहे. २०२३-२४ या गळित हंगामात

७ लाख ९ हजार ११२ मे. टन ऊसाचे गाळप करत १०.५९ टक्के साखर उतारा मिळविला आहे. पूर्णपणे कागदविरहीत कामकाज करणारा देशातील पहिला कारखाना म्हणून कोल्हे कारखान्याची ओळख निर्माण झाली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office