सध्या उन्हाने अंगाची काहिली काहिली होत आहे. या उन्हाच्या तडाख्यात शरीराला थंडावा लाभावा म्हणून लोकांची शीतपेयांकडे ओढ असते. त्यातल्या त्यात उसाच्या रसाला आणि त्यातही लोखंडी चरकापेक्षाही सर्वाधिक पसंती दिली जाते ती लाकडी चरकाच्या सेंद्रिय उसाच्या रसवंतिगृहाला.
याच रसासाठी व त्यातून होणाऱ्या उलाढालीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुका प्रसिद्ध होत आहे.
२७८ रसवंतिगृहे
नेवासे तालुक्यात सुमारे २७८ रसवंतिगृहे आहेत. त्यांपैकी १०५ रसवंतिगृहांमध्ये लाकडी चरक वापरले जात आहेत. शरीराची उष्णता कमी होण्यासाठी व आरोग्याच्या दृष्टीने लोक भर उन्हात उसाच्या ताज्या रसाचा आस्वाद घेताना ठिकठिकाणी दिसत आहेत.
काही भागातील शेतकऱ्यांनी ग्राहकांची गरज ओळखून सेंद्रिय उसाची रसवंती सुरू केली आहे. शहरात ‘मॉर्निंग वॉक’ करणाऱ्या नेवसेकरांची संख्या मोठी आहे. रोज न चुकता ते या रसवंतिगृहावर हजेरी लावून सेंद्रिय उसाच्या रसाचा आस्वाद घेतात.
उन्हाळ्यात अनेक ठिकाणी रसवंत्या थाटल्या जातात. यामध्ये लोखंडी चरक असलेल्या रसवंत्यांची संख्या अधिक आहे. मात्र, लाकडी चरकाच्या रसवंत्याच आकर्षण ठरत आहेत. तालुक्यात नगर- संभाजीनगर महामार्ग, नेवासे फाटा- शेवगाव मार्ग, नेवासे-श्रीरामपूर महामार्ग या मार्गावर दर दोन-तीन किलोमीटर अंतरावर लाकडी चरकाच्या रसवंत्या पाहायला मिळतात.
अशी सर्वाधिक रसवंतिगृहे राहुरी- शनिशिंगणापूर रस्त्यावर तसेच शिंगणापूर शिंगणापूर फाटा या परिसरात दिमाखात थाटलेली दिसत आहे. उन्हाने तप्त व घामाघूम झालेल्या ग्राहकांना तृप करण्याचे काम करताना दिसत आहेत.
लाकडी चरकाची सर्वाधिक रसवंतिगृहे आहेत ती राहुरी-शनिशिंगणापूर तसेच शिंगणापूर – शिंगणापूर फाटा परिसरात.
रसात आले, लिंबू, पुदिना
सेंद्रिय उसाच्या रसामध्ये आले, लिंबू, पुदिना अशा दाह शमवणाऱ्या व आरोग्यास हितावह असणाऱ्या आयुर्वेदिक घटकपदार्थांचा समावेश असल्याने ग्राहक या रसवंतिगृहांना प्राधान्य देण्यात येते.
लाखोंची उलाढाल
नेवासे, शनिशिंगणापूर आदी भागात उसाची लागवड केली जाते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी यालाच आणखी एक जोडधंदा शोधला व उसाच्या रसवंत्या उभ्या केल्या. यातून तरुणांना रोजगार मिळू लागला.
शनी शिंगणापूर असेल किंवा नेवाश्यातील माऊलींचे मंदिर येथे नेहमीच भाविक येत असतात. त्यामुळे या लोकांना ग्राहकही मिळतो. ऊस शेती, व रसवंती गृह यातून हे युवक वर्षभरात लाखोंची उलाढाल करत असतात.