Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘हे’ गाव बनतेय पोल्ट्री फार्मचे हब ! गावात १३० पोल्ट्री फार्म, दररोज पाच लाख अंडी, हजारो कोंबड्यांची विक्री

Pragati
Published:
poltry

Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा हा खरंतर सर्वच क्षेत्रात अग्रेसर. सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात देखील नावाजलेला. आता अहमदनगर जिल्हा शेती व शेतीपूरक व्यवसायात देखील विविध प्रयोग करू लागल्याचे चित्र आहे.

शेतात विविध आधुनिक पद्धतीचा अवलंब करून सफरचंद, हळद, काळा गहू आदींचे उत्पन्न घेण्याचे प्रयोग अहमदनगरमधील शेतात शेतकऱ्यांनी केलेत. आता शेतीला पूरक व्यवसाय म्हणून देखील अनेक युवक पोल्ट्री फार्म या व्यवसायात उतरत आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात असं एक गाव आहे की ज्याला  पोल्ट्री फार्मचे हब असे म्हटले तरी वावगे ठरू नये. हे गाव आहे संगमनेर तालुक्यातील तळेगाव भागातील देवकौठे गाव.

१३० पोल्ट्री फार्म, लाखोंची उलाढाल
देवकौठे गावातील शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून १३० पोल्ट्री फार्म उभारत आर्थिक उत्कर्ष साधला आहे. पोल्ट्री फार्म व्यवसायाद्वारे दररोज पाच ते सहा लाख अंड्यांचे उत्पादन, हजारो जिवंत ब्रॉयलर कोंबड्यांची निर्यात करून लाखोंचे उत्पन्न मिळविले जात आहे.

दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी शेतकरी पोल्ट्री फार्म व्यवसायाकडे वळले, मांस उत्पादनासाठी ब्रायलर आणि अंडी उत्पादनासाठी लेयर पोल्ट्री व्यवसाय शेतकरी करतात. ब्रायलर कोंबडी ४० ते ४५ दिवसांत विक्रीयोग्य होते, तर लेयर कोंबडी १०५ दिवसांची झाल्यानंतर पूर्णपणे विकसित होत अंडे देण्यास सुरुवात करते.

दोन वर्षांपर्यंत लेयर कोंबडीपासून अंडी उत्पादन मिळते. त्यासाठी पक्ष्याच्या आरोग्याची आणि खाद्य, पाण्याची काळजी घ्यावी लागते. ब्रायलर जिवंत कोंबड्या, तसेच लेयर अंड्यांची मोठ्या शहरामध्ये निर्यात केली जात आहे, तर काही व्यापारी जागेवरच येऊन अंडी आणि जिवंत कोंबड्या खरेदी करतात.

त्यातून देवकौठे येथे दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. उत्पादन खर्च वजा जाता चांगला फायदा होत असल्याने पोल्ट्री व्यवसाय किफायतशीर ठरला आहे. शिवाय कोंबडी खतातून अधिकचा आर्थिक फायदा होतो. अंड्यांच्या साठवणुकीसाठी पाच लाख अंड्यांची क्षमता असलेले एक शीतगृह व सात हजार अंड्यांची क्षमता असलेले पंधरा वेअर हाऊस उभारण्यात आले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe