Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याला काल (दि. १० मे) वादळी वाऱ्यासह पावसाने चांगलेच झोडपले. अनेक भागात शुक्रवारी दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वादळाने अनेक ठिकाणची झाडे उन्मळून पडली. तर पिकांचेही नुकसान झाले.
अहमदनगर शहर, कोपरगाव, पारनेर, अकोले आदी भागात वाऱ्यासह पाऊस झाला. पावसाने उकाड्यातून नागरिकांची सुटका झाली. चारा पिके जमिनीवर आली असून कैऱ्यांचाही सडा पडला आहे. हवामान खात्याने जिल्ह्यात ९ ते १३ मे या कालावधीत वादळी, वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला होता.
त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी नागरिक, शेतकऱ्यांना सर्तक राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. अकोले तालुक्यातील मुळा पट्टयात शुक्रवारी दुपारी वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. कोतूळ, वाघापूर, बोरी, धामणगाव पाट, अंभोळ, मण्याळे, करंडी, ब्राह्मणवाडा परिसरांतील शेतीला अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला.
या पावसाने अनेक ठिकाणी घरांचे व छपरांचे पत्रे उडाले. टोमॅटो व झेंडू, चारापिके यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुळा पट्ट्यात हमखास उत्पन्नाचा स्रोत असलेल्या गावरान आंब्याच्या झाडांखाली कैऱ्यांचा सडा पडल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पन्नाचा स्रोत आटला आहे.
या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
विरोलीत ढगफुटीसदृश पाऊस
पारनेर तालुक्यात शुक्रवारी दुपारी पारनेर, कान्हूर पठार, पुणेवाडी, हत्तलखिंडी, वेसदरे, करंदी परिसरात वादळासह पावसाचा तडाखा बसला. विरोलीत ढगफुटीसदृश पाऊस झाल्यामुळे ओढे भरून वाहत होते.
दरम्यान, अवकाळी पावसाने कांदा, केशर आंबा यांना मोठा फटका बसला. पारनेर तालुक्यातील विरोली परिसरात शुक्रवारी दुपारी एकच्या दरम्यान विजांच्या कडकडाटात वादळी पाऊस सुरू झाला. ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने जपेदरा परिसरातील ओढे भरून वाहत होते अशी माहिती समजली आहे.
आनंदवाडीत वीज पडून एक गाय, बैलाचा मृत्यू
शुक्रवारी संध्याकाळी कर्जत शहर आणि तालुक्यात अचानक वादळी वाऱ्यासह विजेच्या गडगडाटात अवकाळी पाऊस झाला. आनंदवाडी (ता. कर्जत) येथे एक गाय, एक बैल वीज पडून दगावले. तर दिघी येथे शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याची माहिती तहसीलदार गुरू बिराजदार यांनी दिली.
शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास कर्जत शहर आणि तालुक्यात वादळी वाऱ्यासह विजेच्या गडगडाटात मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत पावसास सुरुवात झाली. अचानक सुरू झालेल्या पावसाने सर्वसामान्य नागरिकांची चांगलीच धांदल उडाली.