Ahmednagar News : विवाह हा मानवी जीवनातील एक महत्वाचा संस्कार आणि टप्पा आहे. विवाह करताना दोन कुटूंबे आणि दोन आत्मे एकत्र येत असतात असे म्हटले जाते. त्यामुळे हिंदू धर्मात विवाहाला फार महत्व दिले जाते आणि विवाह हा शुभ मुहूर्तावर व्हावा अशी सर्वांची इच्छा असते. म्हणून लग्नकार्य करताना शुभ मुहूर्त, कुंडली पाहून केले जाते.
काहींना उन्हाळ्यात, काहींना पावसाळ्यात तर काहींना हिवाळ्यात लग्नकार्य व्हावे अशी प्रत्येकाला आपआपल्या आवडीनुसार इच्छा असते. परंतू वर्ष २०२४ मध्ये मार्च, एप्रिल महिन्यांत एकही विवाह मुहूर्त नसल्याने अनेक इच्छुक जोडप्यांची लग्ने रखडली होती. आता मात्र विवाहासाठी इच्छुक असलेल्या जोडप्यांना जून आणि जुलै मध्ये लग्नकार्याला मुहूर्त आहेत. परिणामी या दोन महिन्यात अनेकांचा बार उडणार हे नक्की.
जून महिन्यात विवाहासाठी ११ मुहूर्त आहेत. जून, जुलैनंतर थेट नोव्हेंबर महिन्यात विवाह करता येणार आहे. या मधल्या काळात म्हणजे तब्बल पाच महिने मुहूर्त नसल्याने जून, जुलै मध्ये लग्न उरकण्यासाठी नातेवाइकांची धावपळ झाली आहे.
मात्र सध्या पावसाळा सुरु झाला असल्याने ऐन वेळी पाऊस आल्यास गडबड होऊ नये यासाठी अनेकांनी मंगल कार्यालयात लग्न करण्यास पसंती दिली आहे. परिणामी मंगल कार्यालये व केटरिंग बुक करण्यासाठी फोनाफोनी सुरु आहे. तसेच यावेळी मान्सूनच्या पावसाने वेळेत हजेरी लावल्याने शेतकरी पेरण्या करण्यास सुरुवात करतील त्यामुळे लग्नाचा बस्ता व इतर खरेदीसाठी कमी वेळ मिळणार आहे.
असे आहेत लग्नाचे मुहूर्त
जून – १२, १४, १६, १८, १९, २४, २५, २६, २८, २९, ३०
जुलै – ९, ११, १२, १४, १५, १९, २१, २२, २३, २५, २६, २७, २८, ३०, ३१
ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर २०२४ या महिन्यांत लग्नाचे मुहूर्त नाहीत.
नोव्हेंबर – १२, १६, १७, १८, २४, २५, २७
डिसेंबर – २, ४, ५, ९, १०, ११, १४