Ahmednagar News : कमी पटाच्या शाळांचे त्याचे जवळच्या समूह शाळेत रूपांतर करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असल्याची माहिती समजली आहे. परंतु तूर्तास जिल्ह्यातील ४५ छोट्या शाळांचे ११ मोठ्या शाळेत ‘समूह’ करण्याचा घातलेला घाट शाळा व्यवस्थापन समित्यांनी तूर्त तरी उधळून लावला आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला तसे ठराव पाठवून शाळा बंद करण्याला विरोध दर्शविला आहे. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण आयुक्तालयातून २१ सप्टेंबर २०२३ रोजी जिल्हा परिषदेला एक पत्र प्राप्त झाले होते. त्यामध्ये विद्यार्थी गुणवत्तेसाठी समूह शाळा विकसित करण्याबाबतचे नवे धोरण दर्शविण्यात आले होते.
त्यानुसार नंदुरबार येथील तोरणमाळ आणि पुणे जिल्ह्यातील पानशेत या दोन्ही ठिकाणच्या धर्तीवर नगरसह राज्यभरात समूह शाळेचा उपक्रम राबविण्याचा शासन मानस आहे.
या अनुषंगाने नगर जिल्ह्यातील कमी पटाच्या सर्व शाळांचा विचार करून त्या शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा तयार करण्याचे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांना मिळाले होते. जिल्हा परिषदेतून अशाप्रकारे पारनेर तालुक्यातील २८ आणि राहाता तालुक्यातील १७ शाळा कमी पटाच्या असून त्याचे जवळच्या समूह शाळेत रूपांतर करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.
मात्र, वाड्यावस्त्यांवरील ह्या शाळा बंद झाल्या तर पुन्हा विद्यार्थ्यांना कोसन्कोस पायपीट करावी लागणार आहे. यातून विद्यार्थी पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकले जाण्याची भीती आहे. शिवाय अतिरिक्त शिक्षकांचे समायोजनाचा प्रश्नही पुढे येणार आहेच.
या सर्व बाबींचा विचार करून संबंधित शाळा समूह शाळेत रूपांतरित करू नयेत, अशा मागणीचे ठराव राहाता तालुक्यातील संबंधित शाळांच्या शाळा व्यवस्थापन समित्यांनी सादर केले आहेत. तर पारनेर तालुक्यातील शाळा व्यवस्थापन समितींचीही देखील हीच मागणी पुढे आल्याचे समजते.
‘या’ शाळांवर टांगती तलवार
पारनेर भोरवस्ती, शिंदेमळा, फंडवस्ती, चिकणेवाडी, चिकणेझाप, गोडसेवाडी, मानेवाडी, लांडगेवाडी, काळेवाडी, टेकडवाडी कुरणवस्ती, पुणेवाडी वस्ती, तराळवाडी, गडदवाडी, नरोडेवाडी, कारेगाव, खडांबेवाडी, जगताप वस्ती,
पिंपरी पठार, गणेशनगर, सावंत शिर्केवस्ती, कर्पेवस्ती, मोकातेवस्ती, साठेवस्ती, निघुटमळा, एरंडेमळा, करंकंडे मळा, लंकेवाडी. राहाता दळेवस्ती, निंबदेवकर वस्ती, जिजाऊनगर, रामपूर फाटा, कापसे देवकर, खर्डेधुमाळ, राऊतवस्ती कोल्हार, बोठेवस्ती, सदाफळवस्ती, पिंपळस, दहिगाव कोऱ्हाळे, लोणी मुली, बिरोबालवण, मापारवाडी, लोणी बंगला, चारी नं २, म्हस्केवस्ती