अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : शिंदे-फडणवीस सरकारचे ‘ते’ दोन निर्णय लालपरीसाठी ठरले ‘संजीवनी’ ; दोन वर्षात कमावले ‘इतके कोटी’

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : महाराष्ट्राची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटीने नुकतेच ७६ व्या वर्षात पदार्पण केले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षे पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास आणि महिला सन्मान योजनेच्या माध्यमातून महिलांना तिकिट दरात ५० टक्के सूट. महिलासंदर्भातील हा निर्णय एसटीच्या पथ्यावरच पडला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

कारण ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना एसटीच्या बसमधून मोफत प्रवास आणि राज्यातील सर्व महिलांना एसटीच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत या राज्य शासनाने जाहीर केलेल्या दोन लोकप्रिय सवलतींमुळे एसटीला प्रतिपूर्ती रक्कम म्हणून गेल्या दोन वर्षांमध्ये ३८९३ कोटी ८८ लाख ४१ हजार रुपये इतके भरघोस उत्पन्न मिळाले आहे.
या सवलतीच्या प्रतिपूर्ती रकमेमुळे एसटीची आर्थिक गाडी रुळावर आली आहे. परिणामी मे २०२४ मध्ये एसटीला १६ कोटी इतका नाममात्र तोटा झाला असून लवकर एसटीची घोडदौड आर्थिक फायद्याच्या दिशेने सुरू होईल,असे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.

सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची आणि ग्रामीण भागात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे मुख्य साधन असलेली लालपरी लॉकडाऊनमुळे मोठ्या अडचणीत सापडली आहे. लॉकडाऊन काळात एसटी एकमेव सार्वजनिक वाहतूक व्यवस्था रस्त्यावर धावत असली, तरीही प्रतिबंधित क्षेत्राचा अडथळा तसेच कोरोनामुळे प्रवाशांची घटलेली संख्या यामुळे एसटीला मोठा तोटा सहन करावा लागला होता. मात्र नंतरच्या काळात राज्यात सत्तांतर झाले अन शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. यानंतर त्यांनी अनेक निर्णय घेतले.

त्यातील दोन महत्त्वाचे निर्णय म्हणजे, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षे पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास आणि महिला सन्मान योजनेच्या माध्यमातून महिलांना तिकिट दरात ५० टक्के सूट.या दोन निर्णयांमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या एसटीला एकप्रकारची नवसंजीवनीच मिळाली.

या योजनेमुळे मोठ्या संख्यने महिला घराबाहेर पडू लागल्या अन एसटीच्या महसुलात वाढ होत गेली. या नंतर २६ ऑगस्ट २०२३ पासून ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ या नावाने ही योजना एसटीने सुरू केली.

ही योजना सुरू झाल्यापासून ३१ मे २०२४ पर्यंत या योजनेअंतर्गत ३४ कोटी ९९ लाख २१ हजार ३०२ लाभार्थीनी मोफत प्रवास केला असून त्याची प्रतिपूर्ती रक्कम म्हणून राज्य शासनाने एसटीला १७९९ कोटी ३६ लाख ७० हजार रुपये अदा केले आहेत. सध्या दरमहा सुमारे २ कोटी २५ लाख लाभार्थी या योजनेचा लाभ घेत असून प्रतिपूर्ती रक्कम म्हणून एसटीच्या महसुलात दरमहा सुमारे १२५ कोटी रुपये जमा होत आहेत.

२०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये शासनाने राज्यातील सर्व महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून प्रवास करताना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याचे जाहीर केले. ही योजना १७ मार्च २०२३ पासून एसटीने ‘महिला सन्मान योजना’ या नावाने सुरू केली.

ही योजना सुरू झाल्यापासून ३१ मे २०२५ अखेर या योजनेअंतर्गत ७२ कोटी ७६ लाख ११ हजार ५७६ लाभार्थीनी ५० टक्के सवलतीच्या दरामध्ये प्रवास केला आहे. याची प्रतिपूर्ती रक्कम म्हणून शासनाने एसटीला तब्बल २०९४ कोटी ५१ लाख ७० हजार रुपये अदा केले आहेत.

सध्या दरमहा सरासरी ५ कोटी ७५ लाख महिला या योजनेच्या माध्यमातून ५० टक्के तिकीट दरात एसटीच्या विविध बसेसमधून प्रवास करत आहेत. याची प्रतिपूर्ती रक्कम म्हणून राज्य शासन दरमहा सरासरी १८० कोटी रुपये एसटीला देत आहे.

Ahmednagarlive24 Office