Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘या’ गावात सापडले तीन मृतदेह, उष्माघाताने जीव गेल्याची शक्यता, उष्णतेचा कहर

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : सध्या प्रचंड उष्णता असून दिवसा उन्हाचा चटकाही वाढत आहे. सूर्य आग ओकत आहे. उष्णतेच्या लाटेने होरपळ सुरूच असून नागरिकांची लाहीलाही होताना दिसत आहे. कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन अनोळखी इसमांचे मृतदेह आढळून आले असून उष्माघाताने २४ तासांत हे ३ बळी गेले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोपरगाव शहरात काही दिवसांपासून तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. कोपरगाव शहरातील गोदावरी नदी वरील मोठ्या पुलाच्याखाली बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास अंदाजे ३० ते ३५ वय असलेल्या एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला.

तर गुरुवारी २३, मे रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास कोपरगाव शहरातील एचडीएफसी बँकेजवळ असलेल्या जाधव हॉस्पीटलच्या मागील मोकळ्या जागेत अंदाजे वय ६० ते ६५ वर्ष असलेल्या एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. तसेच नगर-मनमाड महामार्गाच्या कडेला तीनचारी नजीक गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास एक ५० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे.

तीनही मृत्यू हे उष्माघाताने झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येते असून त्या तीनही मृतदेहाचा पोलिसांनी पंचनामा केला आहे. सदर तीनही मृतदेह रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीनही व्यक्तींचा मृत्यू कोणत्या कारणांनी झाला याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस करत आहे.

यलो अलर्ट
नगर शहराचे तापमान गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशीदेखील ४१ अंशावर गेले होते. गुरुवारी दुपारी २ वाजता ४९ अंशावर गेलेले तापमान रात्री ८.३५ वाजताही केवळ दोन अंशांनी कमी होऊन ३९ अंश सेल्सिअसवर कायम होते. त्यामुळे रात्री दहा वाजेपर्यंतही वातावरणातील उकाडा कायम होता. दरम्यान, शुक्रवारी (२४ मे) हवामान विभागाने पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.