Ahmednagar News : महावितरण कंपनीची २२० केव्हीची वीज हारेवाडीकडून बाभळेश्वरकडे महाकाय टॉवरद्वारे नेण्याचे काम चालू असतानाच मंगळवार (दि.३०) जुलै रोजी दुपारी या लाईनवरील तीन महाकाय टॉवर निकृष्ठ कामामुळे तारांसह लोहसर, पवळवाडी शिवारात कोसळले.
सुदैवाने या वेळी शेतात काम करीत असलेल्या महिला व शेतकरी या अपघातातून बचावले आहेत. मात्र या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
महावितरणची वीज आष्टी तालुक्यातील हारेवाडी (बारव) येथून बाभळेश्वर सबस्टेशनला जोडण्यासाठी मोठ-मोठे टॉवर उभे करण्याचे काम या भागात चालू आहे. ४२ किलोमीटर अंतराच्या या लाईनसाठी ११० फूट उंचीचे टॉवर पाथर्डी तालुक्यातील लोहसर, पवळवाडी, वैजूबाभळगाव, धारवाडी या भागातील शेतकऱ्यांच्या शेतात उभे करण्यात आले आहेत.
१४१ टॉवरपैकी ३२ टॉवरचे काम या भागात पूर्ण करण्यात आले आहे. महावितरण कंपनीने हे काम मुंबई येथील एका कंपनीला दिले आहे. या टॉवरचे काम अतिशय निकृष्टपणे करण्यात येत असल्याच्या तक्रारीही अनेक वेळा या भागातील शेतकऱ्यांकडून करण्यात आल्या होत्या. काल दुपारी वादळ वारे काही नसताना
पाथर्डी तालुक्यातील लोहसर व पवळवाडी शिवारात उभे केलेले हे महाकाय तीन टॉवर अचानकपणे कोसळले. या भागात शेतीत काम करणारे शेतकरी, महिला या अपघातातून सुदैवाने बचावल्या. लक्ष्मण आनंदराव पालवे यांचा बैल तारा अंगावर पडल्याने गंभीर जखमी झाला तर राजू लक्ष्मण गिते यांच्या संत्र्यांच्या झाडांचे व आंब्याच्या झाडांचे मोठे नुकसान झाले. या भागातील विकास डोंगरे,
नवनाथ सोपान गिते, मारुती निवृत्ती गिते, मिठु तात्याबा गिते यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या तुर, कपाशी, व बाजरीच्या पिकांचे या शेतात तारा पडल्याने नुकसान झाले आहे. या टॉवरच्या निकृष्ठ कामाची चौकशी करुन संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करुन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्यावी,
अशी मागणी या भागातील अनेक शेतकऱ्यांमधून केली जात आहे. बुधवारी महावितरणचे अधिकारी व ठेकेदाराचे कर्मचारी यांनी संयुक्तपणे पडलेल्या या टॉवरची पाहणी केली. यावेळी करंजी आऊट पोस्टचे पोलीस कर्मचारीदेखील उपस्थित होते.