Ahmednagar News : ट्राफिक जॅम ! अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर वाहनांच्या चार किमी रांगा, तीन तास वाहतूक ठप्प

Pragati
Published:
TRAFICK

Ahmednagar News : नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर काल (शुक्रवारी) तब्बल चार तास वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे पाहायला मिळाले. प्रवासी, ग्रामस्थ व बाजारकरूंना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

तोकडी पोलिस यंत्रणा व जबाबदारी असलेल्या बाजार समिती व घोडेगाव ग्रामपंचायतीने कुठलाच प्रयत्न न केल्याने रस्त्याच्या दुतर्फा दोन ते चार किलोमीटर अंतरावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याच आरोप केला जातोय. नगर ते छत्रपती संभाजीनगर – महामार्गावरील घोडेगाव (ता. नेवासा) हे गाव गायी, म्हशीच्या आठवडे बाजारासाठी राज्यासह, देशभरात प्रसिद्ध असलेले गाव आहे.

शुक्रवारच्या बाजारात जनावरांची मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री होते. देशातून मोठ्या संख्येने व्यापारी, जनावरे विक्रेते, ग्राहक, शेतकरी, यांची वर्दळ असते. पण गेल्या काही महिन्यांपासून प्रत्येक शुक्रवारी सकाळी ७ वाजेपासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत वाहतूक कोंडी होते.

दरम्यान काल शुक्रवारी सलग तीन दिवस जोरदार पाऊस झाल्याने रस्त्याच्या पश्चिमेस असलेल्या बाजार समितीच्या आवारात, तसेच पूर्वेस असलेल्या आठवडे बाजारात चिखल आणि दलदल झाली होती. रस्त्यावर लागलेल्या हातगाड्या व विविध साहित्य विक्रीच्या दुकानाने अडचणीत भर पडली.

सकाळी आठ वाजता सुरू झालेली वाहतूक कोंडी दुपारपर्यंत सुरू होती. रस्त्यावर आरामबस, कंटेनर, ट्रक व परिवहन महामंडळाच्या बसची संख्या अधिक असल्याने कोंडी अधिकच वाढली. जवळपास चार किलोमीटरच्या रांगा लागल्या. बाजार समिती प्रवेशद्वार, बसस्थानक व शनिचौकात वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला होता.

तीन किलोमीटर अंतरावर वाहतूक कोंडी झाल्यानंतर वाहतूक पोलिसांची एन्ट्री झाल्याचे दिसले. सोनई, शनिशिंगणापूर पोलिसांसह जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. परंतु, बेशिस्त वाहनचालकांनी चुकीच्या दिशेने वाहने पुढे नेल्याने वाहतूक कोंडीत भर पडली. प्रयत्नांची पराकाष्ठा करत वाहतूक सुरळीत केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe