Ahmednagar News : सहा मृत्युमुखी पडलेल्या प्रवरेत पुन्हा दोन विद्यार्थ्यांचा बुडून अंत

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगरमधील बुडून मृत्युमुखी पडणाऱ्यांची मालिका अद्याप सुरूच आहे. अकोले तालुक्यातील प्रवरेतील केटीवेअर मधील जवानांसह सहा जण बुडून मृत्युमुखी पडल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक घटना घडली आहे.

प्रवरा नदीच्या पात्रात बुडून आता आणखी दोघांचा मृत्यू झालाय. ही घटना संगमनेर येथे घडली. शुक्रवारी (दि. २४) संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास गंगामाई घाट परिसरात हृदयद्रावक घटना घडली. बुडालेल्या दोघांनाही पोहणाऱ्या स्थानिक तरुणांनी बाहेर काढले. परंतु, त्यापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला होता.

आदित्य रामनाथ मोरे (वय १७, रा. बालाजीनगर, घुलेवाडी) श्रीपाद सुरेश काळे (वय १८, रा. कोळवाडे) अशी मयत मुलांची नावे आहेत. हे दोघेही विद्यार्थी असून, ते कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होते.  आंघोळ करण्यासाठी ते दोघे गंगामाई घाट परिसरात आले होते अशी माहिती मिळाली आहे.

नदीपात्रात विहीर असून, तेथे मोठा खड्डा आहे. तेथेच ते दोघे बुडाले. काही वेळानंतर दोघांनाही पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने जवळच्या घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करत त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान मथुरे, सहायक पोलिस निरीक्षक विश्वास भानसी हे घटनास्थळी पोहोचले. प्रवरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा झाला आहे.

त्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यापूर्वीही या खड्ड्यांमध्ये बुडून काहींचे जीव गेले आहेत. वाळूचा अवैधरीत्या उपसा करणाऱ्या वाळू तस्करांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

मित्रांसह कुटुंबीयांची रुग्णालयात गर्दी
दोघेही कनिष्ठ महाविद्यालयीन युवक होते. ते नदीपात्रात बुडाले असल्याची माहिती समजताच त्यांच्या मित्रांनी, कुटुंबीयांनी, नातेवाइकांनी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती.