Ahmednagar News : आग लागण्याच्या अनेक घटना अहमदनगर जिल्ह्यात यापूर्वीही घडलेल्या आहेत. आता थेट बँकेलाच आग लागल्याचा प्रकार घडला आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील नगर-दौंड रस्त्यावरील वाघजाई चौकात असणाऱ्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखेला भरदुपारी विजेच्या शॉर्टसर्किटमुळे मोठी आग लागली. परंतु स्थानिक रहिवाशांनी मदत केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
परंतु ही बँक रहिवाशी क्षेत्रातून हलविण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. अधिक माहिती अशी: तालुक्यातील काष्टी हे मोठ्या बाजारपेठेचे गाव असल्यामुळे येथे मोठी आर्थिक उलाढाल होत असते.
येथील युनियन बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखेला गुरुवारी (दि. १३) दुपारी ३ वा. विजेच्या शॉर्टसर्किटमुळे मोठी आग लागली. आग विझविण्यासाठी कोणतीही उपाययोजना नसताना रहिवाशी, सतीश कुतवळ, आदेश नागवडे, कृष्णा नागवडे, श्रीकृष्ण मखरे यांनी तरुणांच्या मदतीने पाणी टाकून आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. नंतर नागवडे कारखान्याचे अग्निशामक बंब बोलावून घेतले.
शेजारील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या कर्मचाऱ्यांनी बँकेतील बंब काढून आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. युनियन बँकेमागे पाठभिंतीला लागून अवघ्या काही फुटांवर पेट्रोल पंप असल्यामुळे काही क्षणात पंपाला आग लागली असती.
परंतु प्रसंगावधान दाखवून आग विझविण्यात यश आले. आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसून, नुकसान झाले आहे.
कॉम्प्लेक्समध्ये शॉपिंग सेंटर, बँक, पतसंस्था आहेत. बँकेने दर सहा महिन्याला इलेक्ट्रिक ऑडिट करणे गरजेचे असते. परंतु एकही बँक ऑडिट करत नाही. त्यामुळे या इमारतीला सहा महिन्याला कोणत्या तरी शॉपला आग लागते.
हे कॉम्प्लेक्स कमर्शियल नसल्यामुळे येथे बँकेला परवानगी नाही. त्यामुळे ही बँक इतर ठिकाणी स्थलांतरित करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.