Ahmednagar News : विजेच्या कडकडासह वादळी वाऱ्यासह पावसाने काल शुक्रवारी (दि,१० मे ) नगर शहरासह जिल्हाभर हजेरी लावली. हा पाऊस अनेक ठिकाणी सुखावह वाटत असला तरी काही ठिकाणी अवकाळी पावसाने ‘कहर’ बरसावला आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी वीज पडून व वाऱ्यामुळे देखील एका शेतकऱ्यासह आठ शेळ्या, दोन गाय एका बैलाचा मृत्यू झाला.
वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
विजेच्या कडकडासह वादळी वाऱ्यासह राजूर परिसरास शुक्रवारी अवकाळी पावसाने झोडपले. दरम्यान, दुपारी राजूर येथील पंढरीनाथ जयवंत मुतडक (वय ६५) या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
शुक्रवारी सकाळपासून वातावरणात मोठ्या प्रमाणावर उकाडा होता. राजूर, जामगाव व परिसरातील गावांत दुपारी जोरदार अवकाळी पावसाच्या सरी कोसळण्यास सुरूवात झाली.
दरम्यान, दुपारी अडीचच्या सुमारास पंढरीनाथ मुतडक हे आपल्या राजूर येथील शेतात पाऊस उघडल्यानंतर गवत झाकत होते. त्याच वेळी अचानक विजेचा कडकडाट झाला आणि ही वीज पंढरीनाथ यांच्यावर कोसळली आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
यानंतर त्यांचे बंधू पोपट हे शेतात गेल्यानंतर त्यांनी हा प्रकार पाहिला व नातेवाईकांना बोलावले. त्यांना दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
आनंदवाडीत वीज पडून एक गाय, बैलाचा मृत्यू, आठ शेळ्या ठार
शुक्रवारी संध्याकाळी कर्जत शहर आणि तालुक्यात अचानक वादळी वाऱ्यासह विजेच्या गडगडाटात अवकाळी पाऊस झाला. आनंदवाडी (ता. कर्जत) येथे एक गाय, एक बैल वीज पडून दगावले.
कर्जत तालुक्यातील आनंदवाडी येथील पशुपालक कांतीलाल खोसे यांची एक गाय व एक बैल वीज पडून ठार झाले. दिघी येथील बापूराव निंबाळकर यांच्या घरावरील पत्रे उडून गेले. जामखेड येथे वीज कोसळून बैल तर पारनेर तालुक्यातील पुणेवाडी येथे वीज कोसळून आठ शेळ्या ठार झाल्या.