Ahmednagar News : हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज खरा ठरला असून महाराष्ट्रातील विविध भागात अवकाळी पावसाने व वादळाने चांगलाच तडाखा दिला. बीड जिल्ह्यात काहीठिकाणी उन्हाळ्यातही नद्या तुडुंब भरल्या आहेत.
दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील काही भागातही अवकाळीने दणका दिला. शुक्रवारी (दि.१२) सायंकाळी साडेसात आठच्या दरम्यान नगर तालुक्यातील काही भागात अवकाळीने दणका दिला.
वादळ आल्याने व पाऊसला सुरवात झाल्याने कांदा पीक झाकण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच पळापळ झाली. नगर तालुक्यातील सारोळा कासार, खडकी, बाळकी, दहिगाव, साकत, शिराढोण, परिसरात सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरु झाला, यानंतर जोराचा पाऊस सुरु झाला.
यामुळे शेतातील काढून पडलेले कांदा पीक झाकण्यासाठी शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली. आधीच गडगडलेले भाव व त्यामुळे झालेला कांद्याचा वांदा त्यातच अवकाळीने हाता तोंडाशी आलेला घास हाताचा जातो की काय अशी भीती शेतक-यांमध्ये निर्माण झाली.
अवकाळीच्या धास्तीने विजांच्या गडगडात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता हाती लागेल तो त कागद घेऊन कांदा झाकण्याची लगबग केली. शुक्रवारी सायंकाळी झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे काढून पडलेले कांदा पीक भिजून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर वादळी वाऱ्यामुळे खडकी, वाळकी, दहिगाव, साकत येथील संत्रा पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाऊस मात्र जोरदार कुठेही झालेला नाही.
शुक्रवारी सायंकाळी अचानक अवकाळीने तालुक्यातील बहुतांश भागात हजेरी लावली. यावेळी आकाशात ढग जमा झाल्याने काळा कुट्ट अंधार झाला. यावेळी मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट सुरु झाला. अशा परिस्थितीत देखील बळीराजाने स्वतःच्या जीवावर उदार होऊन कांदा पीक झाकण्यासाठी लगबग केली. दरम्यान इतर फळपिकांचे मात्र नुकसान झाले आहे.