Ahmednagar News : यंदा पावसाने फिरवलेली पाठ व धरणातील आवर्तनात कमतरता यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यातच उष्णतेनेही परिसीमा गाठली आहे. याचा परिणाम म्हणजे शेतातील हिरवा चारा गायब झाला आहे. जनावरांना हिरवा चारा मिल्ने मुश्किल झाले असल्याने शेतकऱ्याने आता चाऱ्यासाठी उसाचा वापर वाढवला आहे.
उसाला सध्या मागणी असल्याने तीन ते साडेतीन हजार रुपये टन एवढा भाव मिळत असल्याने चाऱ्यासाठी ऊस विकण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे साखर कारखान्यापुढे आगामी गळीत हंगामासाठी ऊस टंचाईचे संकट उभे राहील अशी शक्यता निर्माण झालीये.
दुष्काळी परिस्थितीमुळे चाऱ्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. त्याचा थेट फटका गायी, म्हशी, बैलांसारख्या गुरांना बसत आहे. या गंभीर परिस्थितीत रोज पशुखाद्याचे व चाऱ्यांचे भाव वाढत आहेत. अहमदनगरमधील केवळ पाथर्डी तालुक्याचा विचार केला तर अंदाजे तीन हजार हेक्टरवर ऊस उभा असून पाण्याअभावी ऊस जळू लागला आहे.
कमी पाण्यात व कमी वाढ झालेल्या उसाला किमान अडीच हजार रुपये टन भाव मिळतो एवढा भाव कारखान्याकडून मिळत नाही. शिवाय सहा महिन्यासाठी उसाचे संगोपन, खते, मशागत असा खर्च करण्यापेक्षा ऊस विकून मोकळे होण्याकडे कल वाढत आहे. तालुक्यात तिसगाव, पाथर्डी, मिरी अशा ठिकाणी ऊस व्यवहार होतात.
शेजारील तालुक्यातून ऊस पाथर्डी बाजारात येत असून पाण्यावर वाढलेला हिरवा गार ऊसाला किमान चार हजार रुपये टन असा भाव मिळतो. कुकाणा, सलबतपुर, भेंडा, दहिगाव, प्रवरासंगम अशा भागातून उसाची आवक वाढली आहे.
वाढलेल्या चाऱ्या बरोबर पशुखाद्य व हिरवा चारा दुभत्या जनावरांना आवश्यक असल्याने मिळेल तेथून व मिळेल त्या भावाने चारा खरेदीकडे दूध उत्पादकांचा ओढा आहे. एवढ्या प्रचंड प्रमाणात ऊस चाऱ्यासाठी व रसवंतीगृहासाठी वापरला गेला तर याचा परिणाम साखर कारखान्याच्या गळीत हंगामावर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.