Ahmednagar News : संगमनेर तालुक्याचा पठारभाग हा नेहमीच दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. मात्र पावसाचे संपूर्ण पाणी हे वाहून जात असल्याने उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होऊन येथील शेती पडीक राहते. त्यामुळे आता पठारभागात पिंपळगाव खांडसारखे धरण होण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
पावसाळ्यात पठारभागात सर्वत्र पाणी पाणीच वाहत असते. त्यामुळे संपूर्ण पठारभाग हिरवाईने नटलेला दिसतो. छोटे-मोठे पाझर तलाव, सिमेंट बंधारे तुडूंब भरून वाहत असतात. फक्त खरिपाची पिके चांगली येत असतात.
उर्वरित पावसाचे पाणी संगमनेरकडे आणि मुळा नदीकडे वाहून जात असते आणि उन्हाळ्यात सर्वत्र पाणीटंचाई निर्माण होवून बंधारे, विहिरी, बोअरवेल कोरडेठाक पडतात. वर्षानुवर्षांपासून ही परिस्थिती पठारभागावर पाहावयास मिळते. त्यामुळे येथील शेती ही पाण्याअभावी पडीक पडलेली असते.
परिणामी महिलांसह पुरूषही रोजंदारीसाठी पुणे जिल्ह्याची वाट धरतात. तिकडे पाटपाणी, धरणे असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीच पाणी असल्याचे मजूर सांगतात. अनेक शेतकऱ्यांनी शेतीला पाणी नसल्याने दुसरीकडे स्थलांतर केले आहे. ज्या पद्धतीने मुळा नदीवर पिंपळगाव खांडसारखे मोठे धरण आहे.
त्याच पद्धतीने पठारभागात असे धरण असते तर संपूर्ण भाग सुजलाम सुफलाम झाला असता. मात्र आजपर्यंत तसे झाले नाही. पठारभागात एखादे मोठे धरण होईल अशा जागाही उपलब्ध आहेत. मात्र, आजपर्यंत पठार भागाकडे कोणीच लक्ष दिले नाही. फक्त निवडणुकांपुरताच पठारभागाचा वापर होत आलाय.
आंबीदुमाला आणि कुरकुटवाडी या दोन गावांच्या सीमेवर कोटमारा धरण बांधण्यात आले. त्यानंतर पठारभागावर असे एकही धरण बांधण्यात आले नाही. त्यामुळे ७५ वर्षांनंतरही पठारभाग हा शेतीच्या पाण्यापासून वंचित राहिला आहे. त्यामुळे आता तरी पठारभागावर पिंपळगाव खांडसारखे धरण बांधण्यात यावे, अशी मागणी शेतकरी करू लागले आहे. या मागणीला कितपत यश येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
वर्षानुवर्षांपासून पठारभाग का शेतीच्या पाण्यापासून वंचित राहिला आहे. फक्त पावसाळ्यात येथे पाणी पाहावयास मिळत आहे. उन्हाळ्यात जमिनी कोरड्याठाक असतात. जर पठारभागात एखादे धरण झाले तर शेतीसह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न मिटणार आहे. त्यामुळे संबंधित विभागाने यावर विचार करून या भागाची पाहणी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करतायेत.