Ahmednagar News : भाजीपाला कडाडला ! मेथीची जुडी ४०, लिंबू ५० रुपये पावशेर

bhajipala

 

Ahmednagar News : उष्णतेने कहर केला असून सध्या अनेक भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. त्यामुळे शेतीला देखील पाणी कमी पडू लागले आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे उत्पन्न कमी पडू लागले असून बाजारात भाजीपाल्याच्या किमती देखील वाढू लागल्या आहेत.

भाजीपाला सध्या गृहिणींचे बजेट बिघडवू लागला आहे. मेथीची एक जुडी ४० ते ५० रुपये, तर पावशेर लिंबांसाठी ४० ते ५० रुपये मोजावे लागत आहेत. यंदा मार्चपासूनच उन्हाची तीव्रता वाढत गेली. त्यामुळे तळी, विहिरी, बोअरवेलमधील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत गेली.

पर्यायाने भाजीपाल्याचे क्षेत्र घटले. त्यातच उन्हामुळे भाजीपाला लवकर खराब होत आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत फळ व पालेभाज्यांची आवक घटली आहे. नगर जिल्ह्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे पीक घेतात.

श्रीगोंदा, श्रीरामपूर, संगमनेर, राहुरी नेवासा, अकोले, शेवगाव येथील भाजीपाला औरंगाबाद, पुणे, मुंबई येथे पाठविला जातो. यंदा तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने त्याचा परिणाम भाजीपाला पिकांवर झाला आहे. भाजीपाल्याचे दर वाढल्याने गृहिणींचे बजेट वाढले आहे.

सध्या उन्हामुळे बाजार समितीत भाजीपाल्याची आवक घटल्याने दर वाढले आहेत. बाजारात आलेला भाजीपाला लवकर खराब होतो त्यामुळे शेतकऱ्यांचेही नुकसान होते आणि व्यापाऱ्यांचेही. वाढत्या दराचा फायदा कुणालाच होत नाही. विक्रीचा अंदाज घेऊनच भाजीपाला खरेदी केला जातो असे शेतकरी व व्यापारी सांगत आहेत.

पावशेर लिंबांसाठी ४० ते ५० रुपये
उन्हाळ्यात जेवणात लिंबाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. सध्या लिंबाचे दर चांगलेच वाढले आहेत. पावशेर लिंबांसाठी ४० ते ५० रुपये मोजावे लागत आहेत. पावशेरात ५ किंवा सहाच लिंबू मिळतात. त्यामुळे एक लिंबू सात ते आठ रुपयांना मिळतो.