Ahmednagar News : अॅड. राहुल झावरे यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्यातील आरोपी असणाऱ्या माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पारनेर नगरपंचायत हद्दीत मालमत्ता अस्तित्वात नसतानाही सन २०१५ मध्ये ३५ शॉप व २५ फ्लॅटची बेकायदा नोंद करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय.
या प्रकरणी माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी याच्याविरोधात पारनेर पोलिस ठाण्यात बुधवारी (दि.३) रात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. नगरपंचायतीच्या वतीने मुख्याधिकारी विनय शिपाई यांनी १२ जूनला पारनेरच्या पोलिस निरीक्षकांना यासंबंधीचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पत्र दिले होते.
त्या अनुषंगाने बुधवारी रात्री उशिरा कार्यालयीन अधीक्षक माधव मारुती गाजरे यांनी याबाबतची फिर्याद दिली. त्यानुसार विजय सदाशिव औटी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.
जामीन अर्जही फेटाळला
अॅड. राहुल झावरे यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला पारनेरचा माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक विजय सदाशिव औटी याच्यासह प्रितेश पानमंद व मंगेश कावरे यांचे जामीन अर्ज नगरच्या सत्र न्यायालयाने बुधवारी फेटाळले. दि. ६ जून रोजी अॅड. राहुल झावरे व इतरांची किरकोळ बाचाबाची झाली होती.
त्या कारणावरून माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी, त्याचा भाऊ माजी नगरसेवक नंदू औटी, प्रितेश पानमंद, मंगेश कावरे, अंकुश भागाजी ठुबे, नीलेश उर्फ धनू दिनकर घुमटकर, संगम सोनवणे, नामदेव लक्ष्मण औटी, पवन बाबा औटी, प्रमोद जगन्नाथ रोहोकले, प्रथमेश दत्तात्रय रोहोकले, सुरेश अशोक औटी यांनी पारनेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात प्राणघातक हल्ला केला होता.
या प्रकरणी पारनेर पोलिसांनी विजय औटी, नंदू औटी, प्रितेश पानमंद व मंगेश कावरे यांना अटक केली होती न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी दिली होती. चारही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर त्यांनी नगरच्या सत्र न्ययालयात जामिनासाठी अर्ज दाखल केले होते.
या अर्जावर मंगळवारी युक्तिवाद होऊन न्यायालयाने विजय औटी, प्रितेश पानमंद व मंगेश कावरे यांचे जामीन अर्ज फेटाळले.