Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. नगर तालुक्यातील अनेक गावात याची दाहकता मोठी आहे. अनेक भागात सध्या पाण्यासह व चाऱ्याचेही दुर्भिक्ष्य जाणवत आहे. उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे.
त्यामुळे जनावरांच्या चारा- पाण्याची मागणी वाढत आहे. अशातच मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यातच काही गावांत मोकळी शिवारे, तसेच माळरानेही चाऱ्याअभावी ओसाड पडल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
विहिरीत व बोअरवेलमध्ये पाणी उपलब्ध नसल्याने हिरव्या चाऱ्याच्या कमतरता आली आहे. सर्व गोष्टींचा ताळमेळ जोडता जोडता शेतकरी हैराण झाला असून दूध उत्पादनात घट झाल्याचे दिसून येत आहे.
नगर तालुक्यातील अनेक गावांमध्ये दुग्ध व्यवसाय जोरात चालतो. त्यावरच अनेकांची उपजीविका सुरु असते. मात्र मागील दोन ते तीन महिन्यांपासून अनेक गावांत जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. आणि त्याचाच परिणाम म्हणून दूध संकलन जवळपास १५-२० टक्के टक्क्यांनी कमी झाले आहे.
जिथे माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला, तिथे जनावरांना चारा आणायचा कुठून अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच दुधाला भाव नाही आणि पशुखाद्याचे ही दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करणारा शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
पाणवठे आटले, विहिरी, बोअरवेलने गाठला तळ
सध्या अनेक गावामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. विहिरी, बोअरवेलने तळ गाठला आहे. त्यामुळे सध्या पाणी टंचाई जाणवत आहे. शेतीला देखील पाणी राहिले नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे पाणी व चारा अशा दुहेरी टंचाईला शेतकरी तोंड देत आहे.
नगर तालुक्यातील काही भागात दोन महिन्यांपासून चाऱ्याची टंचाई भासत आहे. सध्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना ३० ते ४० किलोमीटरवरून चारा विकत आणून जनावरांना जगविण्याची वेळ येथील पशुपालकांवर आली असल्याचे शेतकरी सांगतात.