Ahmednagar News : उन्हाचा कडक चांगलाच वाढलाय. एकीकडे उन्हाची काहिली तर दुसरीकडे ऐन उन्हाळ्यात नगर शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. नगरसाठी ३६ किलोमिटर दूर असलेल्या मुळा धरणातून पाणी आणले जाते.
तीन टप्प्यात उपसा करून हे पाणी आणले जाते. त्यामुळे रात्रंदिवस मुळा धरणातील पाणी उपसा केंद्रावरील विजेच्या मोटारी सुरू असतात. मात्र उपसामध्ये खंड पडला की संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होतो. गेल्या काही दिवसांपासून उपसा केंद्रातील वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे.
बुधवारी पाणी पुरवठा योजनेच्या विळद पंपीग स्टेशन येथील वीज पुरवठा दुपारी काही वेळ खंडित झाला होता. तसेच मुळानगर पंपींग स्टेशन येथील वीज पुरवठा दुपारी तीनपासून जवळपास एक तास खंडित होता
पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन
गेल्या काही दिवसांपासून नगरमध्ये उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. तापमानाचा पारा ३८, ३९, ४० अंश असतो. अशा काळात पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.
अगोदरच शहरातील अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणी येते. त्यात विस्कळीतपणा आल्यानंतर अनेक ठिकाणी पाणीबाणी होते. दरम्यान, वीज पुरवठ्यात सतत खंड पडत असल्याने पाणी पुरवठा विस्कळीत होत असून, नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
उपसा पूर्ववत होण्यास लागतात २-३ तास
वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे पाणी उपसा पुर्णतः ठप्प राहिला. वीज पुरवठा पूर्ववत झाला तरीही बंद पडलेला पाणी उपसा पूर्ववत होण्यासाठी किमान दोन ते तीन तास लागतात. उपसा बंद झाल्यानंतर जलवाहिन्या रिकाम्या होतात, पुन्हा उपसा सुरू झाल्यानंतर तो टप्प्याटप्प्याने करावा लागतो,
अन्यथा पाणी व हवेच्या दाबाने वाहिनी बर्स्ट होण्याची भिती असते. पाणी उपशात खंड पडल्याने वसंत टेकडी येथील जलकुंभात येणारे पाणी कमी येते. परिणामी नगर शहरातील उंच टाक्या पूर्ण क्षमतेने भरल्या जात नाही. त्यामुळे संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होतो.
पाणी पुरवठा विस्कळीत झाला की त्याचा फटका सावेडी उपनगर, बुरुडगांव रोड परिसर, भोसले आखाडा, विनायकनगर, टिळक रोड, कोठी रोड, सीताबन लॉन आदी परिसरासह इतर उपनगरांनाही बसतो.