अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : जिल्ह्यात जलजीवनचा बोजवारा; रतनवाडीच्या ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला ‘हा’ इशारा

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : ग्रामीण भागातील जनतेला नळ जोडणीच्या माध्यमातून शुध्द व स्वच्छ पाणी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलजीवन मिशन योजना आणली. सन २०२४ पर्यत ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लिटर प्रतिदिन गुणवत्तापुर्ण पाणीपुरवठा करण्याचे जल जीवन मिशनचे मुख्य उदिष्ट आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात एकूण ८३० पाणी योजनांसाठी १३३८ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. मात्र या योजनेबाबत सुरुवतीपासूनच अनेक तक्रारी आहेत. या ८३० योजनांपैकी केवळ ११२ योजनाच पूर्ण झाल्या असून ७१८ योजना अपूर्ण आहेत. दरम्यान अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील रतनवाडीच्या जलजीवन योजनेचा खेळखंडोबा सुरू असून योजनेचे काम अतिशय निकृष्ट असल्याने कामाच्या चौकशीसाठी तात्काळ कारवाई व्हावी म्हणून रतनवाडीच्या ग्रामपंचायतकडून तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

अकोले तालुक्यातील आदिवासी गावांमध्ये ‘हर घर जल’ या केंद्राच्या योजनेच्या कामांचा शुभारंभ झाला असून काही गावांच्या योजना अंतिम टप्प्यात आहेत. रतनवाडीतही या योजनेचे काम सुरु आहे; मात्र रतनवाडीच्या जलजीवन योजनेचे काम अतिशय निकृष्ट असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. या योजनेचे काम सुरू असताना बांधण्यात आलेली पाण्याची टाकी गळत आहे. पाण्याच्या टाकीतून पाणी वाहून नेण्यासाठी जोडलेल्या पाईपमधून पाण्याची गळती होत आहे. वॉलमधुनही पाणी वाहते आहे.
ज्या विहिरीतून पाणी टाकीमध्ये सोडले आहे, त्या विहिराला बोअर मारले नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. हे काम गावामध्ये लावलेल्या आराखड्यानुसार झाले नसुन या योजनेचे जो ठेकेदार काम करत आहे. त्याला अनेकदा कामाचा दर्जा सुधारण्यासाठी ग्रामपंचायतकडुन सुचना करण्यात आल्या. या सुचनांना ठेकेदाराने न जुमानता केराची टोपली दाखविली. त्यामुळे नाईलाजास्तव रतनवाडी ग्रामपंचायतने थेट निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना कामाच्या चौकशीसाठी साकडे घातले. तरीसुद्धा प्रशासनाकडुन कोणतीही कारवाई केली गेली नाही. प्रशासनच ठेकेदाराला पाठिशी घालत असल्याने पुन्हा रतनवाडीची ग्रामपंचायत जलजीवन योजनेचे काम चांगले व्हावे व निकृष्ट कामाची चौकशी होऊन कामचुकार अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी, यासाठी अकोले तालुक्याचे तहसिलदार, गटविकास अधिकारी व अकोले पंचायत समिती जलजिवन योजना विभागाला एका निवेदनाद्वारे कामाची तात्काळ चौकशी व्हावी, म्हणुन ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Ahmednagarlive24 Office