Ahmednagar News : शेवगावमधील हातगावच्या तरुणाचं चार दिवसांपूर्वीच लग्न झालेलं.. गुरुवारी (दि.२) होती सत्यनारायची पूजा.. पण तो सकाळी आठ वाजल्यापासून झाला बेपत्ता.. शुक्रवारी (दि.३) दुपारी संबंधित युवकाचा मृतदेह कालव्यात पाण्यावर तरंगताना आढळला..संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले..
चार दिवसांपूर्वी लग्न झालेल्या युवकाचा जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीये. नागेश बंडू गलांडे (वय २५, रा. हातगाव, ता. शेवगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी शेवगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती समजली आहे.
अधिक माहिती अशी : रविवारी (दि.२८ एप्रिल) नागेश गलांडे याचे लग्न झाले होते. गुरुवारी (दि.२) सत्यनारायण पूजेचा कार्यक्रम होता. परंतु त्याच दिवशी नागेश सकाळी आठ वाजल्यापासून कुठेच दिसेना.
फोनदेखील बंद येत होता. त्यामुळे घरचे व ग्रामस्थांनी परिसरात शोधाशोध सुरु केली व त्याची मोटारसायकल हातगाव-पिंगेवाडी गावाच्या दरम्यान जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यालगत सापडली.
त्यामुळे नागेश कालव्यात तर पडला नसेल ना अशी शंकेची पाल मनात चुकचुकली. गुरुवारी दिवसभर कालव्याच्या पाण्यात शोधमोहीम राबवण्यात आली. नागेशचा पत्ताच लागत नसल्याने शेवगाव पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली.
दरम्यान, शुक्रवारी (दि. 3) दुसऱ्या दिवशी शोधमोहीम सुरू असताना दुपारी दोनच्या सुमारास जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यातील चारी क्रमांक 9 च्या गेटजवळ नागेशचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला.
घटनेची माहिती समजताच बोधेगाव पोलिस चौकीचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नानासाहेब गर्जे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह कालव्यातून बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी शेवगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला होता.