Ahmednagar News : खरीप हंगामात जोरदार पाऊस न झाल्याने सध्या अनेक लहान मोठ्या तलावांसह मोठी धरणे देखील खपाटीला गेली आहेत. त्या तुलनेत विहिरी व बोअरवेलने तर कधीच तळ गाठला आहे. त्यामुळे फळबागांचे क्षेत्र धोक्यात आले असून, पारनेर तालुक्यात पाण्याची उपलब्धता असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात डाळींब, सिताफळ, चिकू, संत्रा, लिंबु आदी फळबागांची लागवड करण्यात आली आहे. परंतु आता या फळबागा जगविण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे.
पारनेर तालुक्यातील बहुतांश भागातील शेती हि पावसावरच अवलंबून आहे. त्यामुळे या तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडलेला असतो. पर्यायाने पावसाच्या पाण्यावरच या भागातील शेती अवलंबून असल्याने तालुक्यातील जास्तीत जास्त भागात पारंपरिक पिकेच घेतली जातात. परंतु तालुक्यातील काही भागात असलेल्या भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने फळबागांची लागवड केली आहे.
तालुक्यात फळबागांचे क्षेत्र मोठे आहे. यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्नदेखील मिळत आहे. परंतु यंदा खरीप हंगामात पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्याने खरीपातील पिके वाया गेली. शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन करून रब्बी हंगामातील पिके जगवली. त्यातच अवकाळी पावसाने काहीसा दिलासा दिला तर काही प्रमाणात नुकसानही केले; परंतुआता कडक ऊन तापत आहे, त्यातच विहिरींसह विंधन विहिरींनी तळ गाठला असून, सर्वच तलाव कोरडे पडले आहेत.
त्यामुळे शेतात उभ्या असलेल्या फळबागा जगवाव्या कशा? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून, ते पावसाची प्रतीक्षा करत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी तर विकतचे पाणी घेऊन फळबागा जगविल्या आहेत. शेतकऱ्यांनी खोडाजवळ ओल राहावी म्हणून ऊसाच्या पाचटासह कचरा टाकावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने विहिरींची पाणी पातळी खालावली आहे. शेतकऱ्यांना आणखी काही दिवस, पाऊस पडेपर्यंत बागा जगवाव्या लागणार आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या बागा पाण्याअभावी करपू लागल्या आहेत. त्या जिवंत ठेवणे अवघड झाले आहे. जिथे हंडाभर पिण्याचे पाणी शोधताना जीव मेटाकुटीला येतो, तिथे फळबागा कशा जगवायच्या, हा प्रश्न फळ बागायतदारांना पडला आहे.