Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात चोरट्यांचा चांगलाच सुळसुळाट झाला आहे. जिल्ह्यात दरोडे, चोरी आदी घटना वरचेवर घडताना दिसतायेत. आता संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथून एक चोरीची घटना समोर आलीये.
येथील नंदू ठोंबरे यांच्या मालकीचे साईगगन इलेक्ट्रिकल्स व मोटर रिवायडींग दुकानचे बंद शटरचे कुलूप तोडून अनोळखी चोरांनी सात मिनिटात दीड लाखाची चोरी केली. त्यात महागड्या कॉपर तारा, मोबाईल, इलेक्ट्रिक मोटर व इलेक्ट्रिक साहित्याचा समावेश आहे. रविवारी पहाटे साडेपाच वाजेच्या दरम्यान वाजता ही धाडसी चोरीची घटना घडली.
चोरट्यांनी नियोजनबद्धरीत्या ही चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरटे कैद झाले असले तरी या धाडसी चोरीचा शोध लावण्याचे आव्हान संगमनेर तालुका पोलिसांसमोर आहे.
सीसीटीव्ही फुटेजनुसार दोन युवक दुकानकडे येताना दिसले. एक संशयित दुकानात शिरला. या दोघांनी मिळून ही चोरी केल्याचे दिसते. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल डी. वाय टोपले, पोलिस कॉन्स्टेबल ओंकार शेंगाळ आदींनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. दरम्यान, यापुर्वीही गावात जवळपास १०-१५ वेळेस दुकान फोडून चोरी केलेली आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात चोरट्यांचा धुमाकूळ
जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी धाडसी चोऱ्यांचे सत्र सुरु आहे. या चोऱ्यांमुळे नागरिक धास्तावलेले आहेत. ग्रामीण भागात लोड शेडींग सुरु असल्याने रात्री अंधार असतो, किंवा अनेकदा रात्री लाईट असतील तर शेतकरी शेतात असतात. याचा फायदा घेत चोरटे या चोऱ्या करताना दिसतात. त्यामुळे पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.