Ahmednagar News : काल मंगळवारी केंद्र सरकारने आपल्या आगामी कार्यकाळातील पहिले आर्थिक बजेट सादर केले. यामध्ये विविध योजना, समाजातील विविध घटकांसाठी नियोजन करण्यात आले आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी हे बेजत संसदेत सादर केले. दरम्यान या बजेटमधून अहमदनगर जिल्ह्याला काय मिळाले हे आपण पाहू..

या अर्थसंकल्पातून जिल्ह्यासाठी काय अपेक्षित होते ?
सादर झालेल्या या अर्थसंकल्पातून नगर-पुणे शटल सेवा, नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे, शिर्डी पर्यटन, सूरत- हैद्राबाद एक्स्प्रेस वे, औरंगाबाद-पुणे एक्स्प्रेस वे या प्रकल्पांसाठी तरतूद केली जाण्याची अपेक्षा होती.
अहमदनगर जिल्ह्याला मिळाला भोपळा
परंतु काल सादर झालेल्या आर्थिक बजेटमधून अहमदनगरला काहीच मिळाले नाही. वरील जे अपेक्षित होते याबाबत कोणतीही तरतूद केलेली नाही. त्यामुळे आता या अर्थसंकल्पावर जिल्ह्यातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
पाहुयात कोण काय म्हणाले –
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
अर्थसंकल्पात प्रधानमंत्री आवास, ग्रामसडक योजनेचा चौथा टप्पा, ग्रामीण भागात पोस्ट बँकेच्या शंभर शाखा आणि प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या माध्यमातून एक कोटी घरांना ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची केलेली तरतूद ग्रामीण भागाला दिलासा देणारी आहेत.
खा. नीलेश लंके
दिल्लीतील सरकार वाचविण्यासाठी केविलवाणी धडपड म्हणजे हा अर्थसंकल्प असल्याचे खा. लंके यांनी म्हटले आहे. सर्वसामान्य जनतेला अर्थसंकल्पातून काहीही हाती लागले नाही.
केवळ दोन राज्ये डोळ्ळ्यांसमोर ठेवून अर्थसंकल्प तयार करण्यात आला असून ‘सरकार बनाव, सरकार बचाव’ असा एकमेव उद्देश दिसतो.
आ, रोहित पवार
देशाच्या तिजोरीत सर्वाधिक धन जमा करणाऱ्या महाराष्ट्राला कायमच सापत्न वागणूक देणारे भाजपा सरकार महाराष्ट्रातून पळवलेले प्रकल्प आणि येणारी विधानसभा लक्षात घेता किमान यंदा तरी भरघोस निधी आणि नवे प्रोजेक्ट देईल, ही अपेक्षा होती.
परंतु दुर्दैवाने भाजपा सरकारने आपली परंपरा कायम ठेवत महाराष्ट्राला भोपळा दिला असल्याची प्रतिक्रिया आ. पवार यांनी दिली.