Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात सध्या अचंबित करणारी एक गोष्ट नजरेस पडत असल्याची चर्चा नागरिकांत आहे. ती म्हणजे शहरासह ग्रामीण भागात व परिसरात काही शासकीय बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांसाठी मुबलक वाळू सहज उपलब्ध होत आहे.
एकीकडे, अनेक ठिकाणचे वाळूचे लिलाव झाले नसल्याने त्यांतील वाळूच्या उपशावर बंदी आहे. मग असे असले तरी शहरासह ग्रामीण भागात वाळू येते कुठून, असे प्रश्नवजा कुतूहल नागरिकांत निर्माण झाले आहे.
जामखेडचे चित्र पाहिले तर तालुक्यात बहुतांश नागरिक बांधकामासाठी याच नदीतील वाळूचा वापर करतात; पण, या नदीच्या पात्रातील वाळूचे लिलाव मागील अनेक वर्षांपासून होत नसल्याने या नदीपात्रातील वाळूच्या उपशावर प्रशासनाने बंदी घातली आहे.
तरी मात्र दुसरीकडे, तालुक्यातील गावांमध्ये सुरू असलेल्या शासकीय बांधकामासाठी या नदीच्या पात्रातील वाळूचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा झाल्याने नदी पात्रात मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. तसेच वाळू नसल्याने नदी काठ परिसरातील पाणी पातळीही खालावली आहे.
त्याचा परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे. लोक म्हणतात की, सामान्य माणसाने नदीच्या पात्रातून उपसा केल्यास त्याच्याविरोधात फौजदारी गुन्हे दाखल केले जातात. वाळूचोरट्यांवर प्रसंगी जुजबी कारवाई केली जात असून,
त्याच्याकडे महसूल व पोलिस विभागातील अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करतात. त्यांना अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून वाळूचा उपसा व वाहतुकीच्या रॉयल्टीबाबत विचारणा केली जात नाही. शासकीय सुटीच्या दिवशी वाळूचा उपसा केला जात असल्याने याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
शासकीय बांधकामांच्या नावाखाली वाळूचोरी ?
तालुक्यातील गावांमधील अंतर्गत सिमेंट रस्ते रोड यांसह काही शासकीय इमारतींचे बांधकाम सुरू अहे. या सर्व बांधकामांसाठी तालुक्यातील नदीपात्रातील वाळूचा वापर केला जात आहे. यासाठी लागणाऱ्या वाळूचा उपसा रात्रीच्या वेळी केला जातो. दिवसा नदीपात्रात कुणीही दिसत नाही. या बांधकामाच्या नावावर मोठ्या प्रमाणात नदीतून वाळू उचल करून ती चोरून विकली जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.