Ahmednagar News : आज अगदी ग्रामीण भागातील लहान मुलांना देखील क्रिकेट हा खेळ माहीत आहे. हा माहित नसणारा किंवा क्रिकेटची आवड नसणारा शोधून देखील सापडणे तसे कठीणच. मात्र याच क्रिकेटच्या वेडापाई नगर जिल्ह्यातील चार मुलांनी घरात कोणालाही न सांगता थेट मुंबई गाठली. मात्र पैसे संपले अन मग आला फिल्मी स्टाईल थरार समोर …
राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील चार मित्रांना क्रिकेटचे खूप वेड, त्यामुळे त्यांना क्रिकेटच्या स्टेडियमचे खूप कुतूहल होते. आपणही हे स्टेडियमचे एकदा जवळून पाहावे अशी त्यांची खूप दिवसांपासून इच्छा होती. मात्र तशी संधी मिळत नसल्याने ही इच्छा अपुरीच होती. मात्र चौघांचा विचार पक्का झाला अन बुधवारी (दि. १२) सकाळी ती आपापल्या घरून बाहेर पडली ती थेट मुंबईला जाऊन क्रिकेटचे स्टेडियम पाहायला जायचे या निर्धारानेच.
याबाबाबत घरी आई-वडिलांना वा अन्य कोणालाही कोणतीही कल्पना न देता ती घराबाहेर पडली. प्रत्येकाच्या खिशात तुटपुंजे पैसे. तरीही ती कशीबशी नाशिकमार्गे मुंबईत पोहोचली देखील. दिवभर हि मुले कुठे आहेत काय करतात याबाबत कोणास काहीच माहित नव्हते. परंतु हि सर्व मुले सायंकाळी नेहमीच्या वेळी घरी आलीच नाहीत.
त्यातली दोघेजण अल्पवयीन होते. त्यामुळे पालकांनी सर्वत्र शोधाशोध केली. मात्र मुले कोठेही सापडली नाहीत. त्यामुळे पालक काळजीत पडले, नेमक काय झाले असेल कुठे गेले असतील, काय करत असतील, काही आक्रीत तर नसेल ना घडले अशा अनेक शंका कुशंका पालकांच्या मनात येत होत्या. त्यामुळे न राहून त्यातील एका मुलाच्या आईने राहुरी पोलिसात याबाबत फिर्याद नोंदविली.
तर तिकडे मुंबईत पोहोचलेल्या मुलांना आपल्या घरी पालकांची काय अवस्था असेल याची कल्पना नव्हती त्यांना फक्त क्रिकेटचे स्टेडियम पाहायचे हा एकच ध्यास लागला होता. परंतु घराबाहेर पडल्यानंतर काय करावे लागते याबाबत कोणतीच कल्पना नसलेल्या त्या मुलांकडे असलेले सर्व पैसे संपले.
आधीच घरून कोणास न सांगता आल्याने सर्वांकडेच अत्यल्प पैसे होते. ते प्रवासात संपले होते. त्यामुळे पुढील प्रवास कसा करायचा याबाबत अडचण झाली.
त्यात भूकही खूप लागली. मग आता काय करावे हे समजेना, मग त्यांनी सार्वजनिक फोनवरून घरी फोन केला, कि ‘आम्ही मुंबईत आहोत. आम्हाला क्रिकेटचे स्टेडियम पाहायचे होते, परंतु आमच्याकडील सर्व पैसे संपले आहेत.
त्यामुळे आम्हाला घरी येण्यासाठी पैसे नाही. ते पाठवा. असा फोन येताच आधीच मुलांच्या शोधात व्याकुळ असलेल्या पालकांनी याबाबत राहुरी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ या फोनचे लोकेशन ट्रेस केले असता ते कुर्ला नेहरूनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील होते.
राहुरी पोलिसांनी नेहरूनगर पोलिसांशी संपर्क साधला आणि या त्यांना याबाबत सर्व माहिती दिली. नेहरूनगर पोलिसांनी तातडीने जाऊन चारही मुलांना ताब्यात घेतले. त्यानंतर राहुरी पोलिसांचे पथक मुलांच्या पालकांसह (गुरुवारी) मुंबईला रवाना झाले.चार शाळकरी मुलांना मुंबईला जाऊन क्रिकेटचे स्टेडियम पाहण्याची इच्छा अन त्यानंतर झालेला ‘हा’ थरार सर्वच पालकांच्या डोक्याला झिणझिण्या आणणारा आहे.