अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : अहमदनगर – बीड रेल्वे कधी धावणार; महत्वाची माहिती आली समोर

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : रेल्वे हा बीड जिल्ह्यातील जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न असुन आता हळूहळू मार्गी लागला आहे, हा प्रश्न मार्गी लागण्यास तब्बल पंचवीस वर्षाहून अधिक काळ गेला. या काळात अनेक राजकीय आंदोलने झाली मात्र रेल्वेचे स्वप्न हे स्वप्नच राहत होते. हेच बीड जिल्ह्यातील जनतेचे रेल्वेचे स्वप्न डिसेंबरअखेर पूर्ण होणार असल्याची माहिती खासदार बजरंग सोनवणे यांनी दिली.

नूतन खासदार बजरंग सोनवणे यांनी मंगळवारी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या मॅरेथॅान बैठका घेतल्या. यात प्रामुख्याने नगर-बीड परळी रेल्वे कामाचा आढावा घेतला. त्यांनी एक वर्षात परळीपर्यंत रेल्वेचे काम पूर्ण करण्याच्या सूचना रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच डिसेंबरअखेर नगर ते बीड रेल्वेची चाचणी पूर्ण होणार असल्याची माहिती खासदार बजरंग सोनवणे यांनी दिली. त्यामुळे बीडच्या नागरिकांनी २५ ते ३० वर्षांपूर्वी पाहिलेले स्वप्न या डिसेंबरअखेर पूर्ण होणार आहे.

अहमदनगर – बीड परळी रेल्वे मार्ग २६१ किलोमीटरचा असून गेल्या अनेक दिवसापासून हा प्रश्न रखडला होता. रेल्वेमुळे औद्योगिक वसाहती निर्माण होण्यात मोठ्या अडचणी होत्या. शिवाय बीड जिल्ह्यात उत्पादित झालेला शेतमाल किंवा इतर कच्चामाल परराज्यात किंवा परजिल्ह्यात नेण्यासाठी रेल्वे नसल्याने मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या. १९९५ साली या नगर बीड परळी रेल्वे मार्गला तत्वतः मंजुरी मिळाली होती. मात्र त्यानंतर अनेक वर्ष राजकीय इच्छाशक्तीअभावी या मार्गाचे काम रखडले.

स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी बीड जिल्हावासियांना बीड रेल्वे चे स्वप्न दाखवले होते, आणि त्यांनी या रेल्वे मार्गासाठी भरभरून योगदान देत पंतप्रधान नरेंद्र मोदी कडे हट्ट धरून या मार्गासाठी निधीची तरतूद करण्यास भाग पाडले. त्याच तोडीत राज्य सरकारनेही अर्धा वाटा देत रेल्वे कामास गती देण्याचे काम केले .सद्यस्थितीत हा प्रकल्प तीन हजार कोटीच्या पुढे गेला असून सध्या नगर ते आष्टी या मार्गावर रेल्वे धावत आहे.

नगर ते नारायणडोह या साडेबारा किलोमीटरवरील रेल्वेमार्गावर मार्च २०१७ मध्ये रेल्वेचे इंजिन धावले होते. नगर जिल्ह्यातील साडेबारा किलोमीटरनंतर पुढचा टप्प्यात नारायणडोह ते बीड जिल्ह्यातील सोलापूरवाडीपर्यंतच्या चोवीस किलोमीटर रेल्वे रूळ अंथरणे काम पूर्ण झाले होते व नगर ते सोलापूरवाडी या चाळीस किलोमीटरवर चाचणी दहा डब्याची रेल्वे फेब्रुवारी २०१९ मध्ये या मार्गावर धावली. त्यानंतर सोलापूरवाडी ते आष्टी या तीस किलोमीटरवरील पूर्ण झालेल्या या मार्गावर बारा डब्यांची चाचणी रेल्वे धावली.

दरम्यान मंगळवारी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात नूतन खासदार बजरंग सोनवणे यांनी विविध विभागांच्या बैठका घेतल्या. या दरम्यान नगर-बीड परळी रेल्वे कामाचा आढावा घेत त्यांनी एक वर्षात परळीपर्यंत रेल्वेचे काम पूर्ण करण्याच्या सूचना रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या. डिसेंबरअखेर अहमदनगर ते बीड रेल्वेची चाचणी पूर्ण होणार असल्याची माहिती खासदार बजरंग सोनवणे यांनी दिली.

या वेळी आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी दीपा मुंडे, जि. प. सीइओ अविनाश पाठक, लीड बँकेचे सर्व अधिकारी यांची उपस्थिती होती. रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठकीस अहमदनगर येथील रेल्वे विभागाचे उपमुख्य अभियंता आर. के. यादव उपस्थीत होते. यावेळी उर्वरित भुसंपादनाचे विषय तातडीत मार्गी लावा अशी तंबीही अधिकाऱ्यांना दिली. त्यामुळे डिसेंबरअखेर बीडच्या नागरिकांचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office