Ahmednagar News : कुकडी प्रकल्पाचा डावा कालवा आणि आवर्तने हा नेहमीच चर्चेत राहिलेला विषय. आजही या आवर्तनावर अनेक गोष्टी व शेतकऱ्यांच्या पिकांचे भवितव्यही अवलंबून असते. विशेष म्हणजे याच पाण्यावर तीन जिल्हे व सात तालुक्यांतील राजकारण देखील आजवर खेळत आलेले आहे.
लोकसभा झाल्या कि विधानसभा ते झळ की ल लगेच नवीन काहीतरी असे राजकीय खेळ या कुकडीवर खेळले जातात. पण असे असूनही या प्रकल्पातील पाण्याची वास्तवता कुणीच लक्षात घेतलेली नाही. पाणी मिळत नाही, अन्याय होतो ही बाब जरी खरी असली, तरी त्यामागील नेमके गमक कुणीच शोधत नाही. घोडं नेमकं कुठे पेंड खातेय हे किनीच शोधायला तयार नाही.
येथे आवर्तनात पाणी क्षेत्रावर दिले जात नाही, तर दिवसांवर दिले जात असल्याने विसंगती आहे. पाणी हे क्षेत्रानुसार सोडायला हवे. तरच त्याचा पुरेपूर उपयोग शेतकऱ्याला होतो. परंतु पाणी दिवसानुसार सोडले जात असल्याने शेवटच्या टोकापर्यंत पाणी जातच नाही ही देखील वास्तविकता आहे.
राज्यात सिंचनाच्या बाबतीत पहिल्या पाच तालुक्यांत श्रीगोंदे तालुका आहे, अशी शेखी कायमच मिरवली जाते. पण, ते वास्तव आहे का याची तपासणी होत नाही. कुकडी, विसापूर, घोड ही धरणे व भीमा, घोड, सरस्वती, हंगा आदी नद्यांचे पाणी यामुळे श्रीगोंद्यात बागायती शेती वाढली हे खरे असले, तरी त्यातून नेमका किती क्षेत्राला खरा फायदा होतो याचाही अभ्यास होणे तितकेच गरजेचे आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कुकडीच्या पाण्याचा मुद्दा चर्चेचा मुद्दा होता. आता यापेक्षा विधानसभेला तो जास्त प्रकर्षाने पुढे आणला जाईल. कुकडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यावरील पाण्याचे राजकारण करणाऱ्या नेत्यांनी प्रकल्पाचा अभ्यास केला पाहिजे व त्यातून शेतकरी हिताचे निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा आहे.
श्रीगोंद्यासह ज्या तालुक्यातील कुकडीच्या डाव्या कालव्यावर लाभक्षेत्र आहे, त्या प्रत्येक तालुक्यात निर्मित लाभक्षेत्र वेगळे व सिंचन क्षेत्र वेगळे आहे. या सात तालुक्यापैकी सर्वाधिक लाभक्षेत्र श्रीगोंद्याचे असून, पाण्याचे राजकारणही याच तालुक्यात जास्त होते. कुकडीच्या पाण्याचे नेमके नियोजन करण्यासाठी अभ्यासू व्यक्तींनी पुढे येणे गरजेचे आहे.
श्रीगोंद्यातून जाणाऱ्या डाव्या कालव्यातील ९० ते १६५ किलोमीटर अंतरामधील भाग श्रीगोंदे तालुक्यात येतो. त्यातही ९० ते ११० हे पहिले वीस किलोमीटरवरील गावांचे सिंचन नारायणगाव (पुणे) विभागाच्या अखत्यारीत येतो. त्यात जवळपास ९ हजार हेक्टर क्षेत्र आहे. उर्वरित २१ हजार हेक्टर तो भाग श्रीगोंदे जलसंपदा विभागाकडे आहे.
उन्हाळी हंगामात मात्र साडेसहा ते सात दिवसच पाणी तालुक्याच्या वाट्याला येते व त्यातून साडेपाच ते सहा हजार हेक्टर क्षेत्रच भिजते. हे गणित लक्षात घेता श्रीगोंद्यातील २१ हजार हेक्टरपैकी केवळ अकरा ते बारा हजार हेक्टर क्षेत्रच कुकडीच्या डाव्या कालव्यावर भिजते असे म्हटले जात आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून खरा ताळमेळ बसवणे गरजेचे झाले आहे.