राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयात आहे त्या जागेत लवकरच एक्स-रे मशीनची सुविधा रुग्णांना उपलब्ध करुन दिल्या जातील, असे माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले. त्यामुळे गोरगरीब जनतेला एक्स-रे काढण्यासाठी बाहेर कुठेही जावे लागणार नाही, अशी माहिती त्यांनी दिली.
आमदार तनपुरे यांनी काल अचानक ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन रुग्णालयातील रुग्णांची तसेच रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डी. सी. चौधरी यांची यांची भेट घेऊन अडचणी जाणून घेतल्या. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयास एका संस्थेने आद्ययावत एक्सरे मशीन दिले; पण त्यासाठी सोयीस्कर जागा नसल्याने ते तसेच पडून आहेत.
त्यासाठी जागा मिळाल्यास ते सुरु करता येईल, अशी सूचना केल्यावर आमदार तनपुरे यांनी रुग्णालयातील पाहणी करून त्यांनी रुग्णालयाच्या तळ मजल्यावरील जागेत एक खोली बांधण्यास पालिकेच्या परवानगीची गरज असल्याचे सांगताच आमदारांनी तातडीने मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क करून खोली बांधण्यास मंजुरी दिल्याने तळ मजल्यावर एक्सरे मशीन सुरु करण्याच्या सूचना दिल्या.
ग्रामीण रुग्णालयामध्ये दिवसेंदिवस रुग्णाची संख्या वाढत आहे. त्यामानाने रुग्णालयात कर्मचारी अपुरे असल्याने रुग्णांना लवकर सेवा मिळत नाही, त्याबाबत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करून कर्माचारी उपलब्ध करून दिले जातील, असे आमदार तनपुरे यांनी सांगितले.