Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागात शाळा, वर्गखोल्यांची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. मागील काही दिवसांत अनेक वर्गखोल्यांचे नूतनीकरण देखील झाले आहे.
दरम्यान आता श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी २५ शाळा खोल्या, सहा अंगणवाडी खोल्यांना जिल्हा स्थानिक विकास योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार बबनराव पाचपुते यांनी पावले उचलली आहेत.
पाचपुते यांनी मतदारसंघातील सर्व शाळांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना पत्र दिले. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत.
सकट वस्ती प्रिंपी कोलंदर, पारेवाडी (ता. नगर), वाळुंज (ता. नगर), शिंदेवाडी (आढळगाव टकले भानगाव), महादेववाडी (लोणी व्यंकनाथ), वडगाव तांदळी स्टेशन (म्हातारपिंप्री),
कोकणगाव, कोरेगाव, एरंडोली, रायगव्हाण, चिखली, लिंपणगाव, मेखणी, ढोरजा, शेंडगेवाडी, श्रीगोंदा, बाबुर्डी, आदी शाळांना वर्गखोली मिळणार आहे. पाचपुते यांनी शिफारस पत्र तातडीने दिले.
मात्र, जिल्हा परिषदेमधील अधिकाऱ्यांनी कामांना गती देणे आवश्यक आहे. मेखणी शाळेतील पालकांनी ५ सप्टेंबरला जिल्हा परिषद सीईओंच्या दालनात शाळा भरविण्याचा इशारा दिला आहे.
गटविकास अधिकारी सत्यजित मच्छिंद्र यांनी मेखणी शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांची भेट घेऊन शाळा खोली इमारतीचे काम लवकरच सुरू होईल, असे सांगितले.
अहमदनगर जिल्ह्यातील अनेक शाळांना गरज
अहमदनगरमधील अनेक अशा शाळा आहेत की ज्यांना अद्याप वर्गखोल्या नाहीत. तसेच काही ठिकाणी अत्यंत दुरावस्था देखील झालेली आहे.
त्यामुळे या शाळांना देखील दुरुस्तीची गरज असून शासन, प्रशासनाने तेथेही लक्ष देणे गरजेचे अशे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.