Ahmednagar News : होय पप्पा, मी मम्मीची नाही खरंच तुमची आहे… हे बोल आहेत, बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या वेदिका ढगे या तीन वर्षीय चिमुकलीचे. गुरुवारी सकाळी राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे घडलेल्या घटनेनंतर वडील श्रीकांत ढगे चिमुकल्या वेदिकाच्या आठवणी सांगताना भावुक झाले. त्यांना अश्रू अनावर झाले.
दरम्यान घटनेनंतर वनविभागाने या परिसरात दोन पिंजरे लावले पण पहिल्या दिवशी बिबट्या पिंजऱ्याकडे फिरकलाही नाही. श्रीकांत ढगे यांनी मुलगा सुरेश व मुलगी (नाव ठेवलेच नव्हते) या दोन अपत्यांनंतर कुटुंब नियोजन केले. दुर्दैवाने मुलगी पाच महिन्यांची झाल्यावर सतत आजारी पडू लागली. ती सात महिन्यांची असताना आजारपणातच तिचा मृत्यू झाला.
ढगे दाम्पत्याला मुलीची हौस असल्याने जवळच्या नात्यातील जुळ्या मुलींपैकी वेदिका सव्वा महिन्याची असताना कायदेशीर बाबींची पूर्तता करून तिला दत्तक घेतले. तिचे स्वागत सडा रांगोळी अन् जेवणावळीने केले होते. वेदिका अवघ्या सव्वा महिन्याची असताना ढगे कुटुंबात आली.
रात्री-अपरात्री केव्हाही तिचा आवाज आला की आम्ही पती- पत्नी तिला बाटलीने दूध पाजायचो. तिचा सांभाळ अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे केला. असे वडील श्रीकांत यांनी सांगितले. हे सांगतांना त्यांचे अश्रू थांबता थांबेना.
सायकल आणली होती, पण.. आठवणीने सर्वच भावुक
वडील श्रीकांत तिचा अधिक लाड करायचे, त्यामुळे वेदिका नेहमी ‘होय पप्पा, मी खरंच तुमची आहे.. मम्मीची नाही’ असे म्हणायची. नात्यातील मुलीची सायकल पाहून वेदिकाने हट्ट केला, त्यामुळे श्रीकांत यांनी काही दिवसांपूर्वीच वेदीकाला सायकल आणली पण सायकल खेळण्याआधीच वेदिका बिबट्याची शिकार झाली.