पाथर्डी तालुक्यातील मढी येथील एका तरुणीला फूस लावून पळवून नेऊन सक्तीने धर्मांतर घडवून विवाह लावल्याचा आरोप करत ग्रामस्थ, विविध संघटनांनी केला आहे. याच्या निषेधार्थ गावकऱ्यांनी संतप्त होत पाथर्डी पोलिस ठाण्यावर बुधवारी (दि.६) सकाळी मोर्चा नेला.
संबंधितांवर कठोर कारवाई करावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन पोलिसांना दिले. याप्रकरणी सकाळी ग्रामस्थांनी ग्रामसभा घेत कठोर कारवाईची मागणी केली. दिवसभर कडकडीत बंद पाळला. प्रेम प्रकरणातून मढी येथील एक तरुण आणि तरुणी शुक्रवारी (दि.१) पळून गेले होते.
रविवारी (दि.३) ते दोघे पाथर्डी पोलिस ठाण्यात आल्याचे मुलीचे कुटुंबीय, नातेवाईक मढी येथील ग्रामस्थांना समजले. त्यांनी पोलिस ठाणे गाठले. ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्या तरुणाने मुलीला प्रेम प्रकरणातून फूस लावून पळून नेले.
तिचे धर्मांतर केले. तिचे नाव बदलून विवाह केला, असे मुलीचे नातेवाईक व ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यावेळी कुटुंबीयांनी मुलीशी चर्चा केली. मात्र, ती ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने पोलिसांनी तिची रवानगी महिला सुधारगृहात केली.
असा दुसरा प्रकार शनिवारी (दि. २) रात्रीही घडला आहे. मात्र, ग्रामस्थांनी नगरजवळील चांदबीबी महालाच्या परिसरातून ती मुलगी परत आणली होती, असे ग्रामस्थांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले.
दरम्यान ग्रामस्थांनी या घटनेची सखोल चौकशीची ग्रामस्थांनी मागणी केली. ग्रामस्थांनी यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्याशी चर्चा करत विविध उपाययोजनांबाबत चर्चा केली. यावेळी सरपंच संजय मरकड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.