अहमदनगर बातम्या

गोदावरीत बुडाला तरुण.. २६ तास शोध कार्य, अखेर.. अहमदनगरमधील थरार

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यातील कारवाडी-हंडेवाडी येथील काही शेतकरी गोदावरीला पाणी येईल म्हणून विद्युत मोटार व पाइप काढण्यासाठी गेले होते. यावेळी तिघे गोदावरीत बुडाले होते. सुदैवाने तेथे उपस्थित असणाऱ्या महिलेने साडी टाकून दोघांना वाचवले.

परंतु त्यातील एक शेतकरी संतोष भीमाशंकर तांगतोडे गुरुवारी (दि. २५) गोदावरी नदीत बुडाला होता. महसूल प्रशासन व ग्रामस्थ त्याचा शोध गेहत होते. २६ तासांच्या शोध कार्यानंतर शुक्रवारी (दि. २६) दुपारी अडीचच्या सुमारास त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.

नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले होते. याच दरम्यान, गुरुवारी सकाळी कोपरगाव तालुक्यातील कारवाडी-हंडेवाडी येथील शेतकरी संतोष भीमाशंकर तांगतोडे (वय २५), अमोल तांगतोडे (वय ३०), प्रदीप तांगतोडे (वय २८) व नारायण तांगतोडे (वय ५२) हे विद्युत मोटार व पाइप काढण्यासाठी गेले होते.

संतोष तांगतोडे हा गोदावरीत उतरला. पाण्याचा प्रवाहाचा अंदाज न आल्याने संतोष बुडाला. गुरुवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत शोध कार्य सुरू राहिले. अंधार पडल्याने ते थांबविले. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पुन्हा शोध मोहीम सुरू झाली. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मृतदेह शोधण्यात यश आले आहे.

तहसीलदार संदीपकुमार भोसले, नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, आरोग्य विभाग व फायर ब्रिगेडचे प्रमुख सुनील आरण, मंडळाधिकारी नानासाहेब जावळे, तलाठी दीपाली विधाते, पोलिस पाटील रामराजे भोसले,

पथकामध्ये कालू अप्पा आव्हाड, संजय विधाते, प्रशांत शिंदे, किरण सीनगर, प्रमोद सीनगर, घनशाम कुन्हे, आकाश नरोडे, विशाल, कासार, मंगेश औताडे आदींनी परिश्रम घेतले.

२६ तासानंतर तरंगला मृतदेह 
शुक्रवारी सकाळीच बोटीच्या सहाय्याने शोध कार्य सुरू केले होते व सर्व जण शोध घेत होते. दरम्यान दुपारी जवळपास २६ तासानंतर मृतदेह तरंगत असल्याचे काहींना दिसले.

त्यांनी तहसीलदार भोसले यांना याबाबत माहिती कळवली. त्यानंतर कोपरगाव नगरपरिषदेची रेस्क्यू टीम घानास्थळी आली व त्यांनी बोटीद्वारे संतोषचा मृतदेह बाहेर काढला.

Ahmednagarlive24 Office