अहमदनगर उत्तर

दैव बलवत्तर म्हणून ३० प्रवासी बालंबाल बचावले !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :-  राहाता तालुक्यात मध्यप्रदेश परिवहन महामंडळाच्या पुणे इंदोर प्रवाशी बसचा राॅड तुटल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटून बस रस्त्याच्या कडेला पलटी होऊन जबर अपघात झाला.

या बसमध्ये सुमारे 25 ते 30 प्रवासी होते. मध्य प्रदेश परिवहन महामंडळाची पुणे-इंदोर बस पुण्यावरून इंदोरला जाण्यासाठी चार वाजता निघाली होती.

नगर मनमाड महामार्गावर राहाता येथील न्यायालय जवळ आली असता साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास गाडीचा स्टेरिंग रॉड तुटल्याने चालकाचा गाडीवरील ताबा व नियंत्रण सुटले होते.

परंतु कसेबसे प्रसंगावधान राखत चालकाने गाडी नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. गाडी रस्त्याच्या कडेला एकाबाजूने पलटी झाली. या बसमध्ये सुमारे 25 प्रवासी होते सर्वांचा जीव टांगणीला लागला होता.

बस एका बाजूला कानडी होऊन पडली व जागेवरच स्थिरवल्याने मोठा अनर्थ टळला व चालक-वाहक याचेसह सर्व प्रवाशांचे जीव वाचले. अपघातस्थळा जवळ असलेल्या तांबे वस्तीवरील तरुणांनी मदतीसाठी मोठी धावपळ केली.

मदत कार्यात धावून जात या तरुणांनी तातडीने बस मधील सर्व प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढले.

108 ॲबुलन्स वरील चालक ज्ञानेश्वर थोरात यांनी तातडीने औषधोपचारांची गरज असणाऱ्या प्रवाशांना राहाता येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेतून उपचारार्थ दाखल केले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office