कौतुकास्पद : कोरोनाने भावाला हिरावलं, दिराने विधवा वहिनीसोबत थाटला संसार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :-  असं म्हणतात कि आपण सगळं काही करू शकतो पण नशिबापुढे कुणाचच काही चालत नाही. तसेच काही नाती अपघातांनी हिरावली तर काय करायचे, या प्रश्नाचे उत्तर अनेकांकडे नसते.

तरीही परंपरेचे, समाजाच्या मानसिकतेचे बंध तोडत अकोले तालुक्यातील ढोकरी येथील शेटे कुटुंबीयांनी आपल्या मोठ्या विधवा सूनेचे लग्न आपल्याच लहान मुलाबरोबर म्हणजे पुनमच्या दिराबरोबर केले. अकोले तालुक्यातील ढोकरी येथील निलेश शेटे यांचे लग्न ४ वर्षांपूर्वी पूनम बरोबर झाले होते. त्यांना ३ वर्षांची एक मुलगीही आहे.

निलेश शेटे यांचा कोरोनाने मागच्या वर्षी मृत्यू झाला. त्यांची तरुण पत्नी पुनम अवघी २४ वर्षांची आहे व निलेशचा भाऊ समाधान हाही विवाह योग्य वयाचा आहे. समाधान आणि विधवा पूनम यांचा विवाह केला तर दोघांचाही संसार सुखी होईल. असे गावातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माधवराव तिटमे यांना वाटले.

नातेवाइकांचं मतपरिवर्तन करण्यासाठी . दोन्ही कुटुंबांशी व समाधान तसेच पुनम यांच्याशी अनेक वेळा चर्चा केल्या. गावातील नागरिकांनाही त्यात सहभागी करून घेतले व सर्वांच्या पुढाकाराने समाधान व पुनम यांनी विवाहाचा निर्णय घेतला व नुकताच त्यांचा विवाह म्हाळादेवी येथे येथे संपन्न झाला.

ढोकरीचे माजी उपसरपंच विकास शेटे व दत्तू शेटे यांनीही या घटनेबद्दल आनंद व्यक्त करून सामाजिक प्रबोधनासाठी घडलेली ही अत्यंत महत्त्वाची कृती असल्याचे सांगितले. संगीता साळवे यांनी हा निर्णय घेतल्याबद्दल दोघांचेही अभिनंदन केले.

करोना एकल पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनी करोनाच्या दुसऱ्या लाटेत तरुणांचे मृत्यू मोठ्या प्रमाणावर झाल्याने तरुण विधवांचा प्रश्न गंभीर झाला आहे. आपल्या समाजात पुरुष सहजपणे दुसरे लग्न करू शकतो परंतु तरुण स्त्रीला जातीची, समाजाची, घराण्याच्या परंपरेची, मुले असण्याची कारणे देऊन असा निर्णय घेण्यापासून रोखले जाते.

त्यामुळे ही घटना या सामाजिक बंधनांना झुगारून देणारी महत्त्वपूर्ण घटना आहे म्हणून तिचे स्वागत केले पाहिजे व समाजातील सर्व सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांनी आपल्या परिसरातील असा विवाह करू इच्छिणाऱ्या महिलांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.

करोना एकल पुनर्वसन समितीचे सर्व कार्यकर्ते यांनी ढोकरी येथे जाऊन त्या कुटुंबाचा व नवदाम्पत्य पूनम व समाधान यांना साडीचोळी, शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गावाच्या साक्षीने ललित छल्लारे व संगीता साळवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

गावच्या पाटील घराण्यातील वृद्ध व्यक्तींनी या नव्या विचाराला स्वीकारून संमती दिल्याबद्दल त्यांचेही विशेष आभार मानण्यात आले. या छोटेखानी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक रावसाहेब नवले यांनी केले.

याप्रसंगी करोना एकल पुनर्वसन समितीचे कार्यकर्ते ललित छल्लारे, भाऊसाहेब वाकचौरे, मनोज गायकवाड, संगीता साळवे, प्रशांत धुमाळ, प्रतिमा कुलकर्णी, वसंत आहेर, विठठल शेटे व गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.