अहमदनगर उत्तर

अहमदनगर ब्रेकींग: पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्या पिता-पुत्राला न्यायालयाने ठोठावली ही शिक्षा

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :-  करोना काळात नाकाबंदी दरम्यान पोलीस अंमलदाराला धक्काबुक्की करून मारहाण करणार्‍या पिता-पुत्राला जिल्हा न्यायालयाने भादंवि कलम 353 व 34 अन्वये दोषी धरून

एक वर्ष साध्या कारावास व प्रत्येकी पाच हजार रूपये दंड आणि भादंवि कलम 332 व 34 अन्वये दोषी धरून सहा महिने साध्या कारावास व प्रत्येकी दोन हजार रूपये दंड, अशी शिक्षा ठोठावली आहे.

मुकेश रघुनाथ चोपदार व त्याचा मुलगा प्रसाद मुकेश चोपदार (रा. दिल्लीगेट, नगर) अशी शिक्षा झालेल्या पिता-पुत्राची नावे आहेत.

जिल्हा न्यायाधीश श्रीमती बी. एस. गारे यांनी हा निकाल दिला. सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील आर. आर. त्रिमुखे यांनी काम पाहिले.

येथील तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार सागर भास्कर तावरे दिल्लीगेट येथे 28 जून 2020 रोजी करोना नाकाबंदी साठी कर्तव्यावर असताना दुचाकीवर आलेल्या चोपदार पिता-पुत्राला तावरे यांनी कोविड नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अडविले होते.

यावेळी चोपदार पिता-पुत्राने अंमलदार तावरे यांच्या अंगातील शासकीय गणवेशाची कॉलर पकडून धक्काबुक्की करत त्यांना मारहाण केली होती.

तसेच आम्हाला अडविण्याची तुझी हिंमत कशी झाली, असे म्हणत दमदाटी केली व सरकारी कामात अडथळा निर्माण केला होता.

याप्रकरणी अंमलदार तावरे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चोपदार पिता-पुत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक एच. पी. मुलाणी यांनी करून न्यायालयात आरोपीविरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते.

न्यायालयासमोर आलेले साक्षी-पुरावे व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्यधरून आरोपी चोपदार पिता-पुत्राला कारावास व दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office