वाळूची बेकादेशीर वाहतुक करणारी पिकअप खोल विहिरीत कोसळल्याची घटना काल शनिवारी (दि. २५) पहाटे ४ वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील घांदरफळ गावालगतच्या काटवण मळा परिसरात घडली. या वाहनामध्ये बसलेले चार मजूर बचावले असून पिकअप चालक विहिरीत अडकला. बचाव पथकाने उशिरापर्यंत त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा शोध लागलेला नव्हता. आठ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पिकअप बाहेर काढण्यात यश आले.
याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की संगमनेर तालुक्यातील मंगळापूर परिसरातील प्रवरा नदीपात्रातून वाळूउपसा करून ही वाळू एका विना क्रमांकाच्या पिक अपमधून वाहतूक केली जात होती. काल पहाटे साडेतीन वाजता या पिकअपमध्ये भरलेली वाळू वाहन चालकाने संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग गावामध्ये खाली केली. त्यानंतर तो वाहन घेऊन जवळे कडलग ते धांदरफळ रस्त्यामागें जात होता.
पहाटे चार वाजेच्या सुमारास धांदरफळ परिसरातील काटवण मळ्याजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या अरुंद आणि खोल विहिरीत ही पिकअप कोसळली. घटनेची माहिती समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एस. एस. सातपुते व शेख हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर तहसीलदार धीरज मांजरे हेही सहकायांसह घटनास्थळी पोहोचले.
पिक अपमध्ये चालकासह पाच जण बसलेले होते, अशी माहिती पुढे आली आहे. गोरख नाथा खेमनर (वय २३, रा. डिग्रस, ता. संगमनेर) हा पिकअप चालवत होता. त्याच्या शेजारी दोन तर मागील बाजूला आणखी दोन मजूर बसलेले होते. या पिकअपमध्ये चालक गोरख खेमनर याच्यासह सुदाम राजू वारे, सुनील महादू वारे, संतोष शिवाजी मेंगाळ, समीर सदाशिव मेंगाळ, असे एकूण पाच जण बसले होते. यातील चौघेजण बचावले आहेत. यातील दोघांना किरकोळ जखमा झाल्या. एकजण विहिरीत अडकला.
प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित कार्यवाही सुरू केली. संगमनेर येथून तातडीने क्रेन बोलावण्यात आली. याशिवाय आपत्ती व्यवस्थापन विभाग व सिन्नर येथील बचाव कार्यात तज्ञ समजल्या जाणाऱ्या व्यक्तीस पाचारण करण्यात आले.
सकाळी ८ वाजेपासून विहिरीतून पिकअप काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. आठ तासांच्या अथक प्रयत्नानंतर दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पिकअप बाहेर काढण्यात यश आले. विहिरीत अडकलेल्या एकाला काढण्यासाठी संबंधितांनी परिश्रम घेतले; मात्र सायंकाळी उशिरापर्यंत त्यांच्या प्रयत्नाला यश आले नव्हते. विहिरीच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऑइल व डिझेल सांडल्याने विहिरीमध्ये गेलेल्या पाणबुड्यास श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांनी शोधकार्य थांबवले.
पाणबुड्याची धाडसी कामगिरी
मजुरांना बाहेर काढण्यासाठी सिन्नर येथील गोविंद तुपे यांना पाचारण करण्यात आले. तुपे यांनी यापूर्वी तीन हजार घटनांमध्ये बचाव कार्य केले असून १८० जणांचे प्राण वाचवले आहेत. तुपे घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी धाडसाने ऑक्सिजन मास्क लावून विहिरीत प्रवेश केला. पहिल्या प्रयत्नात त्यांना पिकअपचा तपास लागला. पिकअप बाहेर काढल्यानंतर त्यांनी पुन्हा मास्क लावून विहिरीत उडी मारली; मात्र विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणावर पिकअपचे ऑइल व डिझेल झाल्याने तुपे यांना श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. त्यानंतर ते विहिरीच्या बाहेर आले, तरीही त्यांच्या या धाडसी कामगिरीचे अनेकांनी कौतुक केले.