Ahmednagar News : केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयामार्फत पुणे, संगमनेर, नाशिक हा २३५ किलोमीटर लांबीचा हायस्पीड रेल्वे प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
यात पुणे नगर व नाशिक जिल्ह्यातील गावे बाधीत होणार असून, नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील २६ गावे बाधीत होणर आहेत. या प्रकल्पासाठी या २६ गावातील जमीन संपादित करण्यात येणार आहे.
शिक्षणाचे माहेरघर आणि उद्योगाचे केंद्र असलेले पुणे आणि उत्तर महाराष्ट्रातील महसूल उपविभागाचे मुख्यालय असलेल्या नाशिक या परिसराला जोडण्यासाठी सध्या पुणे ते नाशिक हा राष्ट्रीय महामार्ग आहे. या दृष्टीने केंद्र सरकारच्या रेल्वे विभागाने पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प हाती घेतला आहे.
यात पुणे जिल्ह्यातील ५४, नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील २६ गावे आणि नाशिक जिल्ह्यातील २२ गावातील सुमारे एक हजार हेक्टर जमिनीचे भूसंपादन यासाठी प्रस्तावित आहे.
संगमनेर तालुक्यातील केळवडी, माळवाडी, बोटा, येळखोपवाडी, अकलापूर, खंदारमाळवाडी, नांदूर खंदारमाळ, जांबुत बुद्रुक, साकुर, रानखांबावडी, खांडेरायवाडी, अंभोरे, कोळवाडे, पिंपरणे, जाखुरी, खराडी, जोर्वे, कोल्हेवाडी, सामनापूर, पोखरी हवेली, पारेगांव खुर्द, नान्नज दुमाला, पिंपळे, सोनेवाडी, निमोण आणि पळसखेडे या २६ गावातील भूसंपादन होणार आहे