अपघातात ४६ प्रवासी बालंबाल बचावले.

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

भंडारदरा :- अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाजवळ गार्डनच्या अरुंद पुलावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस व टाटा विंगर या खाजगी प्रवासी वाहतुक करणाऱ्या गाडीची समोरासमोर धडक झाली.

अपघातात दोन्ही वाहनांमधील ४६ प्रवाशी कोणत्याही प्रकारची ईजा न होता बालंबाल बचावले. या अगोदरही काही वर्षापुर्वी बस ड्रायव्हरच्या प्रसंगावधानामुळे ६० प्रवाशी बचावले होते.

सविस्तर वृत्त असे की, अकोले आगाराची कसारा-अकोले ही बस परतीचा प्रवास करत होती. भंडारदरा धरणाच्या बगिच्याजवळ प्रवरा नदीवरील अरुंद पुलाजवळ समोरुन येणाऱ्या टाटा विंगर या खाजगी प्रवासी वाहनाची आणि या बसची एका वळणावर जोरदार धडक झाली.

दोन्ही वाहनांमध्ये एकुण ४६ प्रवासी होते. यामधील एकाही प्रवाशास कोणत्याही प्रकारची शाररीक ईजा झाली नाही. ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी नदीकाठावर असलेल्या झाडांमुळे समोरुन येणारे वाहन दिसत नाही.

बसचे चालक नवनाथ लोखंडे यांनी टाटा विंगरचा चालक एका मोटारसायकलला ओव्हरटेक करत असताना बसवर आदळल्याचे सांगितले.टाटा विंगरचे चालक देवराम सोनवणे यांनी बसचा वेग जास्त असल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला व बस माझ्या गाडीवर आदळल्याचे सांगितले.

अपघातग्रस्त बस व खाजगी गाडी रस्त्यातच असल्याने काही काळ रंधा ते शेंडी या मार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली होती.

अहमदनगर लाईव्ह 24