Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील पठार भागातील साकुर रोड वरील रणखांब फाटा परिसरातील जंगलात अर्धवट जळालेल्या अवस्थेतील आढळलेल्या मृतदेहाचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे.
महिलांसोबत असलेल्या अनैतिक संबंधामुळे हा खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. या खून प्रकरणातील मयत गोरख बर्डे याचे दोन्ही आरोपीच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून दोघांनी गोरख बर्डे याला एका लग्नाच्या वरातीला बोलवून त्याचा खून केला.
त्यानंतर त्याचा मृतदेह रणखांब येथील जंगलात आणून टाकला. मृताची ओळख पटू नये, म्हणून त्याचा चेहरा जाळून टाकला, दोन्ही आरोपींनी खुनाची कबुली दिल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
संगमनेर तालुक्यातील रणखांब परिसरातील जंगलामध्ये दोन दिवसांपूर्वी अज्ञात इसमाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला होता. अज्ञात व्यक्तीने खून करून हा मृतदेह जंगलामध्ये फेकून दिल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता.
पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत दोन दिवसात या खून प्रकरणाचा छडा लावला आहे. रणखांब परिसरात आढळलेला मृतदेह हा गोरख दशरथ बर्डे (रा. मिरपूर लोहारे, ता. संगमनेर) याचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
घारगाव पोलिसांनी दिनेश शिवाजी पवार (रा. वडगाव कांदळी, ता. जुन्नर) व विलास पवार (रा. पेमदरा, ता. जुन्नर), या दोघांना अटक केली असून त्यांनी खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अवघ्या ७२ तासाच्या आत या खून प्रकरणाचा तपास लावला आहे.