अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पुन्हा एकदा पाऊस परतला असून पावसाच्या आगमनाने रखडलेल्या भात लागवडींना आता वेग आला आहे. तर भंडारदरा धरण ४३% भरले असून पावसाचे पुनरागमन झाल्याने भंडारदरा धरणाच्या पाण्याच्या पातळीत संथगतीने वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.
अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात चार ते पाच दिवसापासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे आदिवासी बांधवांची भात लागवड भात खाचरांमध्ये पाणी नसल्याने रखडली होती. भात खाचरांमध्ये पाणीच नसल्याने आदिवासी बांधवांना भात लागवड करणे अवघड होऊन बसले होते.
आषाढी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजेनंतर भंडारदरा धरणाच्या पाणलोटासह परिसरात आषाढ सरींचे तांडव सुरू झाले. भंडारदरा धरणावर पावसाचा जोर कमी असला तरी पाणलोटातील रतनवाडी, साम्रद, घाटघर या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे.
गत चार ते पाच दिवसापासून पावसाचा जोर कमी झाल्याने भंडारदरा धरणामध्ये देखील पाण्याची आवक मंदावली होती. मात्र पुन्हा एकदा पाऊस सुरू झाल्याने भंडारदरा धरणाच्या पाण्यामध्ये संथ गतीने पाण्याची आवक सुरू झाली आहे.
भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ४८२२ दलघफु झाला असून भंडारदरा धरण ४३.६८ टक्के भरले आहे. भंडारदरा धरणाच्या कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात पुन्हा पाऊस सुरू झाल्याने धबधब्यांचे उंचावरून कोसळणे पूर्ववत सुरू झाल्याने पर्यटकांची शनिवारी व रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.
गेल्या २४ तासांमध्ये भंडारदरा येथे ४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून घाटघर येथे २७ मिलिमीटर पाऊस पडला आहे. पांजरे येथे १५ मिलिमीटर तर रतनवाडी ३६ येथे मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
कळसुबाई शिखराच्या परिसरातही आषाढ सरी कोसळत असून कृष्णावंती नदी पुन्हा मोठ्या प्रमाणात वाहती झाली असल्याने वाकी धरणातून १९७ क्युसेकने पाणी कृष्णावंती नदीमध्ये सोडले असल्याने निळवंडे धरणाचा पाणीसाठा वाढत आहे.
गुरुवारी संध्याकाळी भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ४८२२ दलघफु झाला असून भंडारदरा धरण ४३.६८ टक्के भरले आहे. भंडारदरा धरणाच्या पाणी साठ्यावर भंडारदरा धरण शाखेचे शाखाधिकारी अभिजीत देशमुख यांच्या अधिपत्याखाली प्रकाश चव्हाण हे लक्ष ठेवून आहेत.