Ahilyanagar News:- विधानसभा निवडणुकीची अर्ज प्रक्रिया सध्या सुरू असून राजकीय पक्षांच्या माध्यमातून देखील उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या जात आहेत व अद्याप काही याद्या जाहीर व्हायच्या बाकी आहेत.
परंतु याद्या जाहीर झाल्यानंतर त्यातील बऱ्याच विधानसभा मतदारसंघांमध्ये बंडखोरी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बंडखोरांची मनधरणी करण्याचे आवाहन प्रत्येक पक्षापुढे असल्याचे आपल्याला दिसून येत आहे.
अशीच काहीशी परिस्थिती अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले विधानसभा मतदारसंघांमध्ये दिसून आले असून या ठिकाणी भाजपकडून महायुतीधर्म मोडीत निघाला व भाजप नेते वैभव पिचड यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.
त्यामुळे महायुतीतील अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरलेले आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या पुढे मात्र यामुळे अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
अकोले विधानसभेसाठी भाजपचे वैभव पिचड यांनी भरला उमेदवारी अर्ज
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अकोले विधानसभा निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपकडून शुक्रवारी महायुती धर्म मोडीत निघाला असून या ठिकाणी भाजपनेते वैभव पिचड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
गुरुवारी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून आ. डॉ. किरण लहामटे यांनी उमेदवारी दाखल केली. त्यानंतर मात्र शुक्रवारी महायुतीतीलच भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांच्या सहीनिशी नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी अनुप सिंह यादव यांच्याकडे वैभव पिचड यांच्या सूचकांनी दाखल केले.
सध्या वैभव पिचड नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या त्यांच्या आई-वडिलांच्या सेवेत असल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत हा अर्ज दाखल करण्यात आला. काल दुपारी साधारणपणे एक वाजता चार ते पाच हजार पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र येत त्यांनी भाजप संपर्क कार्यालयापासून पदयात्रा काढली.
यामध्ये भाजपचे जेष्ठ नेते शिवाजीराव धुमाळ, अमृतसागर दूध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे तसेच सोमनाथ मेंगाळ, माणिक देशमुख इत्यादींनी वैभव पिचड यांचे नामनिर्देशन पत्र दाखल केले.
आतापर्यंत अकोले विधानसभेसाठी 22 उमेदवारांनी 28 अर्ज नेले असून त्यापैकी चार जणांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे हा एकच अर्ज अधिकृत पक्षाचा उमेदवार म्हणून दाखल करण्यात आला असून बाकी तिघांचे अर्ज अपक्ष म्हणून दाखल झाला आहे.