अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- रब्बी हंगामाची पेरणी व लागवड सुरु असतांना हंगाम उभा करण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरु असतांना महावितरण कंपनीने बेकायदेशिरपणे शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे वीज रोहित्र बंद करुन शेती पंपाचा विद्युत पुरवठा खंडीत करण्याचे काम जिल्हाभर सुरू केले.
रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची अडवणूक करुन पिकांचे प्रचंड नुकसान करण्याचे काम महावितरण कंपनी करत असतांना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी गप्प का? असा आरोप शेतकरी संघटनेचे जिल्हासंपर्क प्रमुख शिवाजी जवरे यांनी पत्रकाद्वारे केला आहे.
२ वर्षांपासून कोरोना महामारीत शेतकरी उद््ध्वस्त झाला असून गेला खरीप हंगामही अति पावासामुळे वाया गेला. एवढ्या ओढाताणीत शेतकरी रब्बी पिके उभे करत असतांनी महावितरण वीज कंपनीने कृषिपंपाची थकीत वीज बील वसुल करण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचा वीज पुरवठा खंडित करत आहे.
थकीत वीजबील वसुलीसाठी शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याआधी वीज कायद्यानुसार ग्राहकाला लेखी आगाऊ नोटीस देणे कायद्याने बंधनकारक असताना तसे उच्च न्यायालयाचे आदेशही आहेत.
तरी महावितरणकडून कायदा धाब्यावर बसवत शेतकऱ्यांची पिळवणूक करत असताना जिल्ह्यातील एकही लोक प्रतिनिधी या प्रश्नावर तोंड उघड्याला तयार नाहीत.
शेतीपंपाच्या थकीत वीजबील प्रश्नी महावितरणने विद्युत पुरवठा खंडित करण्यापूर्वी नोटीस न देता वीज पुरवठा खंडित केला,
अशा शेतकऱ्यांनी संघटीत होऊन शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करून शेतमालाच्या नुकसानीबाबत व बेकायदेशिर वागणाऱ्या महावितरण अधिकाऱ्या विरोधात संबंधित पोलिस स्टेशन व तहसीलदारांकडे तक्रार दाखल करण्याचे आवाहान त्यांनी केले.