अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2022 :- समाजसेवक आदिनाथ ढाकणे यांनी कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीवरील छोट्या पुलावरील रस्त्याची गांधीगिरी करत पुलावर भीक मागून दुरुस्ती सुरू केली आहे.
सविस्तर वृत्त असे की शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीवरील कोपरगाव शहर ,मोहनीराज नगर व बेट भागाला जोडणारा मौनगिरी सेतू असून यावरून मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी देखील मोठ्या प्रमाणात ये-जा करत असतात या पुलावरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून अनेक वाहन-चालक खड्डे वाचवण्याच्या नादात तोल जाऊन पडत आहे त्यामुळे अनेकांचे छोटे मोठे अपघात देखील झाले आहेत.
या पुलाच्या दुरुस्तीबाबत अनेकवेळा गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ ढाकणे यांनी नगरपालिका विभागाच्या संबंधित विभागीय अधिकाऱ्यांसोबत सदर रस्त्याची दुरुस्ती करण्यासंबंधी चर्चा केली परंतु त्यांच्याकडून अपेक्षित असा प्रतिसाद प्राप्त न झाल्यामुळे या पुलावर एखादी मोठी विपरीत घटना घडण्याच्या आधी कोपरगाव कराच्या दारात जाऊन पुलावरील रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी ढाकणे यांनी गुरुवार दि १७ फेब्रुवारी रोजी भीक मागो आंदोलन करत २९२९ रुपये जमा करत पुलावरील रस्त्याची दुरुस्ती सुरू केली आहे. या वेळी ढाकणे समवेत त्यांचा मुलगा प्रज्वल ढाकणे,राम गोत्राळ व रोहन पंडोरे सोबत होते.