अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :- गविख्यात असलेले व करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डी येथून एक महत्वाची माहिती समोर येत आहे.(Shirdi Sai Baba)
शिर्डी येथील साईबाबांची काकड आरती, दिवसभरातील आरत्या व दर्शनाची वेळ पूर्वीप्रमाणेच निश्चित करावी यामध्ये कोणताही बदल करू नये, याविषयावर तातडीने कारवाई करून साई संस्थानला योग्य ते निर्देश करावेत,
अशी मागणी शिर्डी ग्रामस्थांनी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. दरम्यान काळेंना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपण साईबाबा संस्थानचा पदभार स्विकारून काही आठवडे लोटले आहेत.
पूर्वीच्या विश्वस्त मंडळाने भक्तांचा गर्दीच्या व उत्सवाच्या सोयीनुसार साईबाबांच्या दर्शन व आरतीच्या वेळेत वेळोवेळी बदल केला. दर्शनाच्या बाबतीत देखील असेच बदल करत वेळप्रसंगी 24 तास दर्शन सुरू ठेवले.
मुळात वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा जसे की साईबाबांना त्यांच्या पहाटेच्या नियमित मंगल वेळेत भूपाळी ललकारीने निज अवस्थेतून काकड आरतीने जागे करणे, दिवसभरातील दर्शन व आरत्यांच्या विधीनंतर रात्री होणारी शेजारती.
हा वर्षानुवर्ष चालत आलेला नियम पूर्वीच्या विश्वस्त मंडळाने बदलला व दर्शन आणि आरतीच्या वेळेत बदल केला. पूर्वीच्या काळी होणार्या काकड आरती, शेजारती व दर्शनाची वेळ कायम करावी त्यात कुठलाही बदल करू नये.
साईबाबांचे समाधी दर्शन 24 तास कदापीही सुरू ठेवू नये, असे पत्रात नमूद केले आहे. सदर निवेदनाची प्रत साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आली आहे.