अहमदनगर उत्तर

अकोले नगर पंचायत निवडणुकीसाठी ऐंशी टक्क्याहून अधिक मतदान

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :-   अकोले नगर पंचायत निवडणुकीसाठी अकोल्यात 80.69 टक्के पेक्षा अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.(polling)

अनेक प्रभागांत चुरशीच्या लढती झाल्याचे दिसून आले. शहरा पेक्षा शहरा लगतच्या ग्रामीण परिसरात मतदारांत अधिक उत्साह दिसून आला.

नगर पंचायतीच्या 13 जागांसाठी 44 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. एकूण 10 हजार 194 मतदारांपैकी 8 हजार 226 म्हणजे 80.69 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

मुख्य लढत भाजप आणि राष्ट्रवादी शिवसेना युती यांच्यात असली तरी काँग्रेसमुळे अनेक प्रभागांत चुरशीच्या तिरंगी लढती पहायला मिळाल्या. सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरुवात झाली. 13 प्रभागांसाठी 19 मतदान केंद्रे होती. साडेतीन वाजेपर्यंत 68.21 टक्के मतदान झाले.

या वेळेपर्यंतच काही केंद्रांवर 80 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान नोंदले गेले होते.प्रभाग 8 मध्ये सर्वाधिक तर प्रभाग 3 मध्ये सर्वात कमी मतदान झाले.

माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली भाजपने 12 जागा लढविल्या आहेत. पिचड यांनी कार्यकर्त्यांसह सर्व मतदार केंद्रांना भेटी दिल्या.

तर राष्ट्रवादी तर्फे आमदार डॉ. किरण लहामटे, जिल्हा बँकेचे संचालक, ज्येष्ठ नेते सिताराम पाटील गायकर, जि. प. चे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे, जि. प. सदस्या सुनीता भांगरे मतदान काळात अकोलेत तळ ठोकून होते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office