अहमदनगर Live24 टीम, 03 नोव्हेंबर 2021 :- कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेवून गेली अनेक महिने जनावरांचा आठवडी बाजार बंद करण्यात आला होता. त्यानंतर जनावरांमधील वाढत्या आजाराच्या पार्शवभूमीवर पुन्हा आठवडी बाजरी बंद करण्यात आला होता.
मात्र आता हाच आठवडी बाजार आता पुन्हा एकदा खुला करण्यात येत आहे. राज्यातील प्रसिद्ध असलेला नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील जनावरांचा बाजार अखेर 5 नोव्हेंबरपासून पूर्ववत सुरू होणार आहे. याबाबतची माहिती बाजार समितीचे सचिव देवदत्त पालवे यांनी दिली आहे.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी मागील महिन्यात 8 ऑक्टोबरला आदेश काढून जिल्ह्यातील राशिन, मिरजगाव, काष्टी,
वाळकी, घोडेगाव, लोणी, जामखेड व संगमनेर हे सर्व प्रमुख जनावरांचे बाजार लाळ्या-खुरकतच्या साथीचा प्रसार होऊ नये यासाठी पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जारी केला होता.
दोन दिवसांपूर्वीच जिल्ह्याधिकारी यांनी पुन्हा बाजार सुुरू करण्याचा आदेश काढला असून त्यामुळे आता येत्या शुक्रवारचा (5 नोव्हेंबर) घोडेगाव येथील जनावरांचा बाजार भरणार आहे.
जनावरांचा बाजार सुरु होणार असला तरी बाजार समितीच्या वतीने कोरोना संसर्गाची पुर्ण काळजी घेतली जाणार आहे. एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे.